तिच्यावर बलात्कार करून मारून टाक, सातवीच्या मुलाने वर्गमैत्रिणीची दिली 100 रुपयांत सुपारी

विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका सातवीच्या मुलाने नववीत शिकणाऱ्याला मुलाल आपल्याच वर्गमैत्रिणीची सुपारी दिली आहे. तिच्यावर बलात्कार कर आणि तिचा खून कर असे म्हणून या मुलाने नववीच्या मुलाला 100 रुपयेही दिले होते. शाळेने आधी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. पण मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली म्हणून ही धक्कादायक गोष्ट उघडकीला आली. या प्रकरणी दौंड पोलिसांनी मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की पुण्यातील एका इंग्रजी माध्यमातील मुलाने आपल्या प्रगती पुस्तकावर वर्गातच पालकांची खोटी सही केली. सही करताना वर्गातल्याच एका मुलीने पाहिले. नंतर शिक्षिकेने या मुलाच्या प्रगतीपुस्तकावर सही पाहिली आणि त्यांना संशय आला. शिक्षिकेने या मुलीला विचारल्यावर मुलीने त्या मुलानेच खोटी सही केल्याचे सांगितले.

या गोष्टीचा राग या मुलाने धरला. या मुलाने नववीच्या एका मुलाला 100 रुपये दिले आणि या मुलीवर बलात्कार करून खून करण्याची सुपारी दिली. त्या मुलीला याबाबत कळाले, तेव्हा ती घाबरली आणि तिने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. मुख्याध्यापकांनी या मुलांना बोलवून दरडावले आणि सोडून दिले. त्यानंतरही मुलगी घाबरली होती, घरी गेल्यानंतर ती रडत होती. पालकांनी विचारल्यावर तिने झाला प्रकार सांगितला. पालकांनी शाळेत तक्रार केल्यानंतरही या मुलावर शाळेने कारवाई केली नाही.

अखेर मुलीच्या पालकांनी दौंड पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.