
बापच मुलीवर अत्याचार करतो, अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. अशा घटनांमध्ये मुलीने बापाचा खून करायला हवा, असं म्हणत अभिनेत्री अलका कुबल यांनी महिला अत्याचाराच्या घटनांवर संताप व्यक्त केला आहे. अत्याचारी बापावर आखाती देशांप्रमाणे कारवाई झाली पाहिजे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. जळगावच्या खान्देश करिअर महोत्सवामध्ये अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत.
देशात आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता अलका कुबल म्हणाल्या की, “आपण नेहमी पोलिसांना दोष देतो. मात्र मला असं वाटतं की, याला आजूबाजूचे जे लोकही जबाबदार असतात. बऱ्याच वेळा आपण पाहतो तर, असं लक्षात येतं की, या घटना घरातच घडत असतात. कोणाचा कोणाचा चुलत भाऊ असतो, कुठे आते भाऊ असतो.”
त्या म्हणाल्या की, “आता मागच्या महिन्यात एक बातमी पाहिली की, वडील आपल्या चार मुलींवर बलात्कार करत होते. मला असं वाटलं चार मुलींनी आपल्या बापाचा खून करायला पाहिजे होता. आपल्याकडे कडक शिक्षा व्हायला पाहिजेत. महिलांवर अत्याचार रोखायचं असतील तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवे. तिथे लोकांना कायद्याची भिती वाटते.”