हुंडा न दिल्याने सुनेला जिवंत जाळलं, 7 वर्षानंतर 70 वर्षीय महिलेला जन्मठेपेची शिक्षा

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात आपल्या सुनेला जिवंत जाळल्याच्या गुन्ह्यात एका 70 वर्षीय महिलेला स्थानिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने तिला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना 20 डिसेंबर 2017 रोजी जिल्ह्यातील गुगली पोलीस स्टेशन हद्दीतील अमोधा गावात घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सून आरती गौर (23), असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे सून आरतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या कौशल्या देवी हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पवनकुमार श्रीवास्तव यांनी मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकील संतोष कुमार मिश्रा यांनी सांगितले की, गुन्हेगार महिलेने तिच्या सुनेला जिवंत जाळले.

सरकारी वकिलांनी सांगितले की, मृत महिलेचे वडील जय प्रकाश गौर यांच्या तक्रारीच्या आधारे कौशल्या देवी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान नऊ जणांनी साक्ष दिली. यानंतर न्यायालयाने दोषीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका मृत महिलेच्या पती आणि सासूला हुंडाबळीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायाधीश अभय श्रीवास्तव यांनी दोषी पती दर्शन सिंग (29) आणि त्याची आई कमलेश देवी (63) हिला प्रत्येकी 15,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.