1956 च्या आधी वडिलांचे निधन झाले असल्यास मुलीचा त्यांच्या मालमत्तेवर काहीच हक्क राहत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
हिंदू वारसा हक्क कायदा 1956 मध्ये लागू झाला. त्याआधी वडिलांचे निधन झाले असेल तर त्यांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क आहे की नाही हा मुद्दा न्यायालयासमोर उपस्थित झाला होता. सविस्तर सुनावणी घेऊन याआधी सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निकालांचा आधार देत न्या. अतुल चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने वरील निर्वाळा दिला. 1956 च्या आधी निधन झालेल्या पतीच्या मालमत्तेवर विधवेचाही हक्क राहत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाचे निरीक्षण
1937 मध्ये विधवा महिलेला अधिकार देणारा कायदा होता. त्यावेळी मुलीचा विवाह झाल्यानंतर ती माहेरच्या कुटुंबीयांचा भाग राहत नव्हती. त्यामुळे त्या कायद्यात केवळ विधवेला संरक्षण देण्यात आले होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
दोन पत्नींमुळे उपस्थित झाला मुद्दा
यशवंतराव यांचा लक्ष्मीबाई व भिकूबाई यांच्याशी विवाह झाला होता. लक्ष्मीबाईला सोनूबाई व राधाबाई अशा दोन मुली होत्या. भिकूबाईला चंपाबाई नावाची एकच मुलगी होती. लक्ष्मीबाईचे 1930 मध्ये निधन झाले. यशवंतरावचे 10 जून 1952 रोजी निधन झाले. भिकूबाईचे 1973 मध्ये निधन झाले. निधनाच्या आधी भिकूबाईने मालमत्तेचे सर्व अधिकार मुलगी चंपाबाईच्या नावे केले. या मालमत्तेत माझाही अधिकार असल्याचा दावा करत लक्ष्मीबाईची मुलगी राधाबाईने न्यायालयाचे दार ठोठावले. यशवंतराव माझे वडील होते. त्यांच्या मालमत्तेवर माझाही अधिकार आहे, असे राधाबाईचे म्हणणे होते. मात्र यशवंतरावच्या निधनानंतर पत्नी भिकूबाई ही एकमेव पतीच्या मालमत्तेची वारस आहे, असे न्यायालयाने नमूद केले.