मुलीचा अमेरिकेत अपघात; व्हिसासाठी वडिलांची वणवण, केंद्राला साकडे घालूनही पदरी निराशाच

उंब्रज-वडगाव येथील सह्याद्री सहकारी कारखान्याचे माजी संचालक संजय विठ्ठल कदम यांची भाची नीलम तानाजी शिंदे हिचा 14 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत भीषण अपघात झाला असून ती कोमात आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार तिच्या रक्तातील व्यक्तीकडून गुन्हा दाखल करण्यासाठी कुणीही तिथे हजर नसल्याने गुन्हा दाखल करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अमेरिकेत जाण्यासाठी तिच्या वडिलांची धडपड सुरू असून सरकारकडून त्यांना सहाय्य मिळावे यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे साकडे घातले आहे. नीलमची प्रकृती गंभीर असून तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. याबाबत रुग्णालयाकडून नीलमच्या कुटुंबीयांना ई-मेलद्वारे कळवण्यात आले असून तिच्या रक्तातील कुणीतरी सदस्याने तत्काळ अमेरिकेत येण्याची सूचनाही केली आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. परंतु तांत्रिक अडचणींमुळे मुलगी आणि वडिलांची भेट दुरावली आहे. केंद्र सरकारने याबाबत सहाय्य करावे अशी अपेक्षा नीलमच्या कुटुंबीयांची आहे, परंतु अनेकांना भेटूनही त्यांच्या पदरी निराशाच आहे.

सुप्रिया सुळे यांचे परराष्ट्रमंत्र्यांना आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना नीलमच्या वडिलांना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. नीलमचा अमेरिकेतील अपघात आणि सध्या तिच्या वडिलांची अवस्था चिंता वाढवणारी गोष्ट आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही समस्या सोडवण्यासाठी नीलमच्या कुटुंबीयांना मदत करायला हवी असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. भाजप नेते जयशंकर यांच्याशी मतभेद असू शकतात, परंतु जेव्हा परदेशात एखाद्या हिंदुस्थानी विद्यार्थ्याला मदत करण्याची वेळ येते तेव्हा ते मागे-पुढे पाहत नाहीत, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.