नाराजी नाट्यानंतर पालकमंत्री बदलले, वाशिम जिल्ह्याचे पालकत्व दत्तात्रय भरणेंकडे

महायुती सरकारमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून तिढा निर्माण झाला होता. अजित पवार गट आणि मिंधे गट दोघेही अडून बसल्याने हा तिढा अद्याप संपलेला नाही. त्यातच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली होती. त्यामुळे महायुतीमधील नाराजी नाट्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने 26 मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करून वाशिम जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर केले.

महायुती सरकारमध्ये काही दिवसांपूर्वीच मंत्र्यांना पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले. यामध्ये स्वजिल्हा न मिळाल्याने शिंदे आणि अजितदादा गटाच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले होते. अजितदादा गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा मूळ जिल्हा कोल्हापूर आहे. मात्र, त्यांच्याकडे 625 किमी लांब असलेला वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्याने ते नाराज होते. अखेर मतदारसंघात वेळ देता येत नसल्याचे कारण देत मुश्रीफ यांनी वाशिम जिह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली होती. तेव्हापासून हे पद रिक्त होते. आता ज्या जागी दत्तात्रय भरणे यांची निवड करण्यात आली आहे.