भुमरेंच्या धमक्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल : दत्ता गोर्डे

‘भुमरे पितापुत्रांच्या भोवती असणारा गोतावळा हा निव्वळ व्यावसायिकांचा आहे. पैठणचा निष्ठावंत शिवसैनिक मिंधे गटाच्या मागे गेलेला नाही. त्यामुळे कट्टर परंतु सामान्य शिवसैनिकांना पोकळ धमक्या देण्याची आगळीक करु नका. अन्यथा जशास तसे उत्तर देऊ !’ असा स्पष्ट इशारा महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात समाविष्ट असलेल्या परंतु पैठण विधानसभा मतदारसंघातील पिंप्रीराजा गावात झालेल्या प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते. प्रचार रॅली, पदयात्रा व सभांना उपस्थित राहणाऱ्या शिवसैनिकांना विविध माध्यमांतून दमदाटी केली जात आहे. या दडपणाला खरा शिवसैनिक भिक घालत नाही. मतदार या निवडणुकीत मशाल चिन्हाचे बटण दाबून महाविकास आघाडीचा शिवसेनेचा आमदार करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक शिवसैनिक हाच आमदार असणार आहे. हे लक्षात ठेवा,’ असेही दत्ता गोर्डे यांनी स्पष्ट केले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अनिल पटेल, माजी सभापती तथा शिवसेना माजी तालुकाप्रमुख डॉ. सुनील शिंदे, माजी आमदार संजय वाघचौरे, संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सीए सचिन घायाळ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कांचन चाटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मुरलीधर अण्णा चौधरी, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, श्याम बाबा गावंडे, माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड व दिलीप भोसले उपस्थित होते.

शैक्षणिक संस्थांऐवजी दारु दुकाना आणल्या

माजी सभापती डॉ. सुनील शिंदे यांनी सांगितले की, ‘संदिपान भुमरे हे 30 वर्षे सर्व प्रकारची सत्तास्थाने हातात असताना विकास करु शकले नाहीत. एमआयडीसी भागाला अवकळा आली आहे. परिणामी तरुण बेरोजगार आहेत. जागतिक किर्तीचे संत ज्ञानेश्वर उद्यान कुलूपबंद आहे. त्यामुळे पैठणची बाजारपेठ ठप्प झाली आहे. पैठणी साडीचे क्लस्टर येवला येथे गेले तरी हे महाशय गप्पगार राहिले. अशा विपरीत परिस्थितीत पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. एकही शैक्षणिक संस्था न आनणाऱ्या भुमरे पितापुत्रांनी दारुच्या दुकाना मात्र जागोजागी थाटल्या आहेत. त्यामुळे मतदारांनी यावेळी मशाल चिन्हाचे बटण दाबून परिवर्तन घडवून आणावे !’ असे आवाहन त्यांनी केले.