डेटाही महाग; ग्राहकांना भुर्दंड,  रिचार्ज प्लान आजपासून महाग

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या तीन कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज दर वाढवले आहेत. जिओ, एअरटेलचे नवे रिचार्ज प्लॅन उद्या 3 जुलैपासून लागू होतील, तर व्होडाफोन-आयडियाचे नवे दर 4 जुलैपासून लागू होतील. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

सर्वात आधी नव्या रिचार्ज प्लॅन दरांची घोषणा केली. त्यानंतर एअरटेलने टॅरिफमध्ये वाढ केली. सुरुवातीला व्होडाफोन- आयडिया कंपनीकडून दरवाढीची कोणती घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे व्होडाफोन- आयडिया युसर्जचा जीव भांडय़ात पडला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण या दोन्ही पंपन्यांच्या मागोमाग व्होडाफोन – आयडियानेही दरवाढ घोषित केली.

 एअरटेलने टॅरिफमध्ये 10 ते 21 टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. नवीन प्लाननुसार, आता 179 चा प्लान 199 रुपयांत मिळणार आहे. प्रीपेड दर दररोज सरासरी 70 पैशांनी वाढले आहेत. पोस्टपेड योजना 10 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आता 449 रुपयांना मिळणार आहे. हे वाढलेले दर 3 जुलैपासून लागू होतील.

 रिलायन्स जिओनेही रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. बुधवारी कंपनीने, याबाबत माहिती दिली आहे. जिओकडून सांगण्यात आले की, 3 जुलैपासून रिचार्ज प्लॅन 15 ते 25 टक्क्यांनी महाग होणार आहेत. रिलायन्स जिओचा 239 रुपयांचा लोकप्रिय प्लॅन आता 299 रुपयांचा झाला आहे. यामध्ये रोज दीड जीबी डेटा मिळतो आणि त्यांची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.

 वोडाफोन आयडियानेही टॅरिफ प्लान वाढवले आहेत. कंपनीने प्रीपेड आणि पोस्ट पेड अशा दोन्ही प्लॅन्सच्या दरात वाढ केलेय. ही वाढ 21 टक्क्यांपर्यंतची आहे. 28 दिवसांसाठी 179 रुपयांचा रिचार्ज प्लानसाठी आता 199 रुपये मोजावे लागणार आहेत. 269 आणि 299 रुपयांचा 28 दिवसांचा प्लॅन अनुक्रमे 299 आणि 349 रुपयांचा झाला आहे.

वर्षभराच्या रिचार्जसाठी 600 रुपये जास्त

रिलायन्स जियो आणि भारती एअरटेल युजर्सना वर्षभराच्या रिचार्जवर 600 रुपये जास्त द्यावे लागतील. जिओच्या वार्षिक रिचार्जबद्दल बोलायचे तर या प्लॅनची सध्याची किंमत 2999 रुपये आहे. यामध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो आणि अनलिमिटेड 5 जी डेटा मिळतो. 3 जुलैनंतर या प्लॅनसाठी 3599 रुपये मोजावे लागतील. म्हणजे 600 रुपये जास्त द्यावे लागतील.