
कोणत्याही आर्थिक पत पुरवठा करणाऱ्या संस्थेने पारदर्शक कारभार करत कमावलेला विश्वास ही त्या संस्थेच्या विश्वासाहर्तेची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचे ठाम प्रतिपादन दशरथ पाटील यांनी असोंड येथे बोलताना व्यक्त केले. जनकल्याण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था असोंड ची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्था उपाध्यक्ष विश्वास खांबे तसेच गजानन पेठे, विनोद गोंधळेकर, कमालकर आंग्रे, संतोष पवार, मारूती चिपळूणकर, रेणूका चोगले, करूणा जाधव, नितिन यादव, राजाराम रसाळ, डाॅ. सुनिल गोरीवले, प्रमोद रहाटे आदी संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे चेअरमन दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पाटील यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करताना त्यांनी अहवाल वर्षातील संस्थेचा आर्थिक लेखाजोगा सर्वसाधारण सभेत मांडला. मार्च 2024 अखेर संस्थेची सभासद संख्या 3669 असून वसुल भाग भांडवल 2 कोटी 10 लाख 41 हजार 400 रूपये आहे. संस्थेच्या ठेवी 26 कोटी 70 लाख 45 हजार 196 रूपये आहेत संस्थेला मार्च 2024 अखेर 65 लाख 15 हजार 118 रूपये इतका निव्वल नफा झाला असून सभासदांना 15 टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाच्या वतीने जाहीर करत असल्याचे जाहीर केले त्याला उपस्थित सभासदांनी टाळयांच्या गजरात मान्यता दिली.
यावेळी शासनाचे सहकार विषयक धोरण आणि पतसंस्थांचे कामकाज याबाबत संस्थेचे चेअरमन दशरथ पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. संस्था सातत्याने अ वर्ग दर्जा प्राप्त करत आली असून गेली कित्येक वर्ष सभासदांना 15 टक्के लांभाश देणारी ग्रामीण भागातील जनकल्याण पतसंस्था ही जिल्हयातील एकमेव संस्था असल्याने सभासदांनी संस्थेच्या एकुणच प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. संचालक मंडळाने सचोटी आणि काटकसरीने केलेल्या कारभामुळेच संस्थेच्या नव नव्या शाखांचा विस्तार होत असल्याच्या समाधानाची भावना व्यक्त करत उपस्थित सभासदांकडून संस्थेचे संचालक तसेच अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे कौतुक करत तशाप्रकारचा सभासदांकडून ठराव पारीत करण्यात आला.