सामान्य भाविकांसाठी राम मंदिरातील रामलल्ला दरबाराचे दर्शन बंद; कमी जागेमुळे ट्रस्टने निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण

अयोध्येत भव्य सोहळय़ात राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत रोज लाखोंच्या संख्येने भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येत आहेत. कुणीही रामलल्लाच्या दर्शनापासून वंचित राहू नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आल्याचा दावा राम मंदिर ट्रस्टकडून केला जात आहे; परंतु आता सामान्य भाविक राम मंदिरातील रामलल्ला दरबाराचे दर्शन घेऊ शकणार नाहीत. राम दरबाराची जागा कमी असून जागेअभावी सर्वच भाविकांना राम दरबारात दर्शन घेता येत नाही, असे कारण देण्यात आले.

राम मंदिरात वरच्या मजल्यावर रामलल्लाचा दरबार असणार आहे. या राम दरबारात प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या प्रतिमा असणार आहेत. येथील जागा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वसामान्य भाविकांना जाता येणार नाही, असे स्पष्टीकरण राम मंदिराचे प्रशासक गोपाल राव यांनी दिले आहे.

भाविकांमध्ये भेदभाव

काही मोजकेच भाविक राम दरबाराला भेट देऊ शकतील, असेही राम मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे. दरम्यान, दर्शनासाठी रोज लाखो भाविक येतात. राम दरबाराच्या दर्शनासाठी एक लाख भाविक एकत्र आले तर दर्शन शक्यच होणार नाही. जागेअभावी असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गोपाल राव यांनी दिली.