समुद्रकिनाऱ्याजवळ जाळ्यात अडकलेल्या कासवाला मिळाले जीवदान; रेस्क्यू टीमचे प्रयत्न यशस्वी

मासे पकडण्याच्या तंगुस दोऱ्याच्या जाळयात अडकलेल्या समुद्री कासवाची सुखरूप सुटका करून कासवाला जीवदान दिले. मृत्यूच्या संकटात अडलेल्या प्राणी मात्रावर भुतदया दाखवत प्राणी मित्रांनी केलेले कार्य खरोखरच कौतूकास पात्र आहे.

दापोली तालुक्यातील लाडघर औदुंबर वाडी येथील महेंद्र मोरे यांच्या राहत्या घरासमोरील समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी 5 जुलै रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंगुसच्या जाळयात एक कासव अडकले असल्याचे बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या सुरेंद्र शंकर मोरे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही बाब लाडघर येथील प्राणी मित्र प्रथमेश पेंडणेकर, सुभाष पेंडणेकर यांना सांगितली. समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या महेंद्र मोरे यांनी क्षणाचाही विलंब न करता जाळयात अडकलेल्या कासवाची सुखरूपणे सुटका करून समुद्रात सोडून कासवाला जिवदान दिले. यामुळे दापोलीत महेंद्र मोरे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दापोली तालुक्यातील दाभोळ ते केळशी आणि मंडणगड तालुक्यातील वेळास या निसर्ग रम्य आणि शांत समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या शेवटी आणि उन्हाळयात अजस्त्र ऑलिव्ह रिडले टर्टल या महाकाय समुद्र कासवांची विण होते. आजही दुर्दैवाने या कासवांची आणि त्यांच्या अंडयाचे हाल जिभेचे चोचले पुरविण्यासाठी केले जातात. दाभोळ ते वेळास दरम्यानचा समुद्र किनारा हा कासवांच्या प्रजाती उत्पत्तींचा समुद्र किनारा मानला जातो. अशा या समुद्र किनाऱ्यावर मासेमारी व्यवसाय चालतो. जुणे जिर्ण झालेले वा अन्य ठिकाणाहून वाहून आलेले मासे पकडण्याचे जाळे हे कासवांना त्रासाचे होते त्यामुळे अनेकदा समुद्रात मोठ मोठाली कासवे जाळयात अडकून जायबंदी होतात तसे शुक्रवारी लाडघर समुद्र किनाऱ्यावर जाळयात अडकून पडलेल्या कासवाला जिवदान देण्यास महेंद्र मोरे आणि सहकारी यशस्वी ठरले. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी सोमवारी 3 जुलै 2023 रोजी महेंद्र मोरे, मनाली मोरे, प्रकाश दरीपकर आदींनी याच समुद्र किना-यावर जाळयात अडकलेल्या दोन कासवांना जाळयातून सोडवून जीवदान दिले होते त्यानंतर वर्षभराने परत अशाच प्रकारची दुसऱ्यांदा घटना घडली.