
विविध सण, उत्सव तसेच निवडणूक बंदोबस्तासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यातच दापोली तालुक्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची 2 पोलीस स्थानकात मिळून एकूण 129 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मंजूर पदे आहेत, त्यापैकी तब्बल 49 पदे ही रिक्त असल्याने त्या पदांच्या कामाचा अतिरिक्त ताण हा कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर पडत आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलीस दलावर आहे. त्या पोलीस दलातील दापोली पोलीस ठाण्यासह दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात एकूणच असलेल्या मंजूर पदांपैकी कित्येक मंजूर पदे ही रिक्त आहेत. त्यामुळे येथे कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर रिक्त असलेल्या पदांच्या अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने पोलिसांवरील ताण सातत्याने वाढत आहे. याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत आहे.
पोलिसांची नियोजित तसेच प्राप्त परिस्थितीतील कामे पाहता मनुष्यबळ कमी असल्याने त्याचा परिणाम पोलिसांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. एकूणच वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पोलिसांच्या संख्येत लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ करणे आणि ती पदे विनाविलंब भरणे अपेक्षित आहे. त्यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण काहीसा हलका होऊ शकेल. ज्यामुळे दापोलीतील कायदा व सुव्यवस्था स्थिती अधिक मजबूत होऊ शकेल. तसेच वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच कायदा व्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी दापोली कार्यरत असलेल्या पोलिसांवर आहे. मात्र हे हातच तोकडे असतील, तर वाढत्या गुन्हेगारीला आळा कसा बसणार हा मोठा प्रश्नच आहे.
दापोली पोलीस स्टेशन अंतर्गत माहिती
1) एकुण गावे – 151
2) लोकसंख्या – दापोली शहर – 34956 , दापोली तालूका – 1,78,340
3) दुरक्षेत्र एकुण 5 , हर्णे, बुरोंडी, उन्हवरे , पालगड आणि आडे तर बीट संख्या 3 आहे
4) एकुण गुन्हे संख्या – भाग 1 ते 5 , भाग 6 , दारूबंदी, अकस्मात मयत आदी 1) सन 2020 मध्ये 230 , सन 2021 मध्ये 334 , सन 2022 मध्ये 286 , सन 2023 मध्ये 299 , सन 2024 मध्ये 286
5) पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे मंजूर संख्याबळ – 1 पीआय, 2 पीएसआय, 65 अंमलदार पैकी उपलब्ध संख्याबळ पीआय 1 , एपीआय 2 , पीएसआय 5 , अंमलदार – 58 एकूण मंजूर अंमलदार 65 पैकी रिक्त 7 आहेत.
दाभोळ सागरी पोलीस ठाणेतर्गत
1) एकुण गावे – 26 ,
2) लोकसंख्या – 39746 ,
3) एकुण गुन्हे संख्या – भाग 1 ते 5 , भाग 6 , दारुबंदी, अकस्मात मयत आदी 1) सन 2020 मधील गुन्ह्यांची संख्या 27 , सन 2021 मधील गुन्ह्यांची संख्या 45 ,सन 2022 मधील गुन्ह्यांची संख्या 46 , सन 2023 मधील गुन्ह्यांची संख्या 25 , सन 2024 मधील गुन्ह्यांची संख्या 38 तसेच 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत गुन्ह्यांची संख्या 2 झाली आहे.
4) दाभोळ सागरी पोलीस ठाणेतर्गत एकुण पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांचे मंजुर संख्याबळ एकूण 61 पैकी 1) पीआय 2 पद त्यापैकी 1 रिक्त आहे. 2) अंमलदार मंजूर पदे 59 पैकी रिक्त जागा 40 आहेत.