वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेल्या कळंबट रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असताना बांधकाम विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. रस्त्यांची सुधारणा न करता बांधकाम विभाग फक्त बघ्याच्या भुमिकेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दापोली तालुक्यातील सारंग पंचक्रोशीतील गावांसाठी महत्वाचा असलेला दापोली-सारंग-कळंबट-म्हैसोंडे-वाघवे-अडखळ मार्ग हा वाहतुकीसाठी धोक्याचा झाला आहे. या मार्गावरील गावातील रहिवाशांना दापोलीत येण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. परंतु या मार्गावर भले मोठे खड्डे पडले आहेत. डोंगर रांगेच्या उताराला लागूनच रस्ता जात असल्याने डोंगरातून झिरपणारे पाणी हे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये तूंबून राहत आहे. रस्त्यातील खड्यात तुंबलेल्या गढूळ पाण्यामुळे रस्त्यातील खड्ड्याच्या खोलीच्या व्याप्तीचा वाहन चालकांसह पादचाऱ्यांना अंदाज येत नसल्याने कित्येकजण धडपडून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्ता अरुंद असल्याने आणि या मार्गावरील वाहतुकीची वर्दळ पाहता रस्त्याची तातडीने सुधारणा करणे अपेक्षित आहे. मात्र बांधकाम विभागाच्या दुर्लक्षेमुळे मोठी दुर्घटना घडण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या महत्त्वाच्या रस्त्याची सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.
सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करून सुद्दा अजूनही रस्ता सुधारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले नाही. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहता रस्ता सुधारणा करून रस्ता वाहतूकयोग्य करावा, अशी मागणी नरेंद्र करमरकर, दापोली तालुका सचिव, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी केली आहे.