सेल्फीचा मोह पडला महागात, सांगलीतील टेम्पो ट्रॅव्हलर लाडघर समुद्रात रुतली

पुणे येथून टेम्पो ट्रव्हलरने लाडघर येथील समुद्रकिनाऱयावर पर्यटनासाठी महिला पर्यटकांना घेऊन आलेल्या सांगली येथील एका टेम्पो ट्रव्हलरच्या चालकाला सेल्फी चांगलाच महागात पडला. टेम्पो ट्रव्हलरच्या चालकाने महिला पर्यटकांना हॉटेलला उतरून तो एकटाच टेम्पो ट्रव्हलर घेऊन समुद्रकिनाऱयावर आला आणि तो चालवत असलेली टेम्पो ट्रव्हलर सेल्फी काढण्याच्या नादात समुद्राच्या पाण्यात रुतल्याने त्यांना चांगलाच घाम फुटला.

शनिवार-रविवार या दोन जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे दापोली तालुक्यातील समुद्रकिनाऱयावर पर्यटक मोठय़ा प्रमाणात भटपंतीसाठी आले होते. अशाच प्रकारे सांगली येथील मूळ रहिवाशी असलेला एक वाहनचालक हा आपल्या ताब्यातील 17 सीटर टेम्पो ट्रव्हलर पुणे येथील 17 महिला पर्यटकांना दापोली येथे पर्यटनासाठी घेऊन आला होता. त्याने त्या महिला पर्यटकांना सागर सावली या सुप्रसिद्ध हॉटेलात उतरवून तो एकटाच लाडघर येथील समुद्रकिनाऱयावर त्याच्या ताब्यातील टेम्पो ट्रव्हलर घेऊन आला. लाडघर येथील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आणि निळय़ाशार पाण्याच्या फेसाळणाऱया समुद्राच्या पाण्याच्या लाटा पाहताच त्याने समुद्राच्या पाण्यात टेम्पो ट्रव्हलर घातली आणि तो चालक वेगवेगळय़ा अँगलने सेल्फी काढू लागला. वेगवेगळय़ा अँगलमधील सेल्फी काढण्याच्या नादात त्याला आपल्या ताब्यातील टेम्पो ट्रव्हलर समुद्राच्या पाण्यात केव्हा रुतली हे त्याला समजलेच नाही.

जेसीबीच्या सहाय्याने गाडी ओढली

टेम्पो ट्रव्हलर रुतल्यानंतर स्थानिक पर्यटन व्यावसायिक मदतीसाठी धावून आले; मात्र पुळणीत खोलवर रुतलेल्या टेम्पो ट्रव्हलर आणि त्यातच समुद्राच्या पाण्याला आलेली भरती यामुळे दोरखंडाने ओढूनही वाहन पाण्यातून बाहेर निघेना. अखेर दापोली येथून जेसीबी मागविण्यात आला; मात्र समुद्राच्या पाण्याला आलेल्या भरतीमुळे जेसीबी आणूनही काहीच उपयोग झाला नाही. अखेर मध्यरात्री पाणी ओसरल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो ट्रव्हलर बाहेर काढण्यात आला.