दापोली तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेने पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. मात्र पोलीस तपासादरम्यान महिलेच्या पतीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. हा खून त्याच्या पत्नीने आणि प्रियकराने मिळून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्या महिलेला आणि प्रियकराला दापोली पोलिसांनी अटक केली.
दापोली तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथील एका महिलेने पती निलेश दत्ताराम बाक्कर बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात केली होती. त्या व्यक्तीचा तपास करत असताना पोलीसांनी त्या महिलेची चौकशी केली. ती ज्या हॉटेलमध्ये काम करत होती तिथून ती साडेअकरा वाजता घरी आल्याची माहिती महिलेने पोलीसांना दिली. मात्र, महिलेची घरी येण्याची वेळ आणि कामवरून निघण्याच्या वेळेत बेपत्ता झालेल्या निलेशचा मोठा भाऊ दिनेश यांनी वहिनीवरच संशय व्यक्त केला होता.
पोलिसांनी कसून शोध घेतल्यानंतर असे समजले की निलेश बाक्करची पत्नी आणि तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर, रा.पालगड, दापोली या दोघांनी निलेश बाक्कर याला हर्णै बायपास येथील मोकळ्या जागेत घेऊन जाऊन त्याला अधिक प्रमाणात दारू पिण्यास भाग पाडले. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळून त्याला ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह चारचाकी गाडीतून नेऊन पालगड, पाटीलवाडी येथील रस्त्यालगतच्या विहिरीत टाकला. विहिरीत टाकण्यापूर्वी त्याच्या अंगावर चारचाकी गाडीचा तुटलेला लोखंडी पाटा बांधला होता. त्यानंतर निलेश बाक्करच्या पत्नीने तो बेपत्ता झाल्याचा बनाव रचला. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी निलेश बाक्कर याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर आरोपी मंगेश शांताराम चिंचघरकर आणि निलेश बाक्करच्या पत्नीला दापोली पोलीसांनी अटक केली. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.