आयपीएल लिलावासाठी व्हिटोरी सोडणार ऑस्ट्रेलियाची साथ

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या बहुचर्चित बॉर्डर-गावसकर कसोटी करंडक क्रिकेट मालिकेचा सलामीचा सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे. मात्र या पर्थ कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी संघासोबत नसतील. सनरायझर्स हैदराबादचा प्रशिक्षक म्हणून ते आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या आगामी हंगामासाठीच्या मेगा लिलावात सहभागी होणार आहेत. आयपीएलचा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू फिरकी गोलंदाज डॅनियल व्हिटोरी हे आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक असून आंतरराष्ट्रीय संघात सहाय्यक म्हणून भूमिकाही बजावत आहेत. 2022 पासून ते अॅण्ड्रय़ू मॅकडोनाल्डच्या नेतृत्वाखाली तिन्ही फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने त्यांना प्रँचाइझी क्रिकेटमध्येही प्रशिक्षक करण्याची परवानगी दिली आहे.