धोकादायक धबधबे पर्यटकांच्या जिवावर, सुरक्षा योजनाच नाहीत, थेट बंदीची कारवाई

या वर्षी पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा धबधब्यांमध्ये बुडून पर्यटकांचा नाहक जीव गेल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मात्र धबधब्यांवरील सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना न करणाऱया राज्य सरकारने थेट पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने पर्यटकांना बंदी घालण्यापेक्षा सीसीटीव्ही, पोलीस पहारा, सुरक्षा गार्ड अशा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.

लोणावळय़ातील भुशी डॅम परिसरात रविवारी झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर ताम्हिणी घाट परिसरात एक 32 वर्षीय तरुण पाण्यात वाहून गेला. त्यापाठोपाठ सोमवारी कोल्हापूरमधील काळम्मावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली. राज्यात एकापाठोपाठ घडणाऱया या दुर्दैवी घटनांमुळे राज्यातील पर्यटन स्थळांवरील सुरक्षा वाऱयावर असल्याचे समोर आले आहे. एखादी घटना घडली की कारवाईचा दिखावा केला जातो; मात्र कालांतराने पुन्हा या ठिकाणी ‘जैसे थे’च असल्याचे समोर येत आहे.

‘भीमाशंकर’मध्ये पर्यटनास बंदी

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात पावसामुळे निसरडय़ा झालेल्या वाटांवर होणाऱया अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत येथील निसर्गवाटा 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनासाठी बंद केल्या आहेत. यापूर्वी वनखात्यातर्फे पुणे जिह्यातील मुळशी परिसरात ताम्हिणी घाटातील जंगलात आणि धबधब्याच्या परिसरात 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटनास बंदी घातली आहे.

पर्यटकांचा अतिउत्साहदेखील कारणीभूत

दरवर्षी पावसाळय़ात हजारो पर्यटक लोणावळय़ासह विविध धबधब्यांना भेटी देतात. मद्यपान करून किंवा पाण्याचा अंदाज नसतानाही पोहण्यास उतरणे, प्रतिबंधित क्षेत्रात जाऊ नका असे स्पष्ट सूचनाफलक लावलेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणे, सेल्फीच्या मोहापायी आपल्यासह इतरांचा जीव धोक्यात टाकणे असे प्रकार बेजबाबदार पर्यटकांकडून घडतात. त्यामुळे पर्यटकांमध्ये स्वयंशिस्त गरजेची असल्याचे मत लोणावळय़ातील ‘शिवदुर्ग मित्र’ या रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड यांनी व्यक्त केले.

हुल्लडबाजी सहन करणार नाही

लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, शिवलिंग पॉइंट येथे सायंकाळी 6 वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा हुल्लडबाजी करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.