पाजपंढरी गावातील गजानन महाराज मंदिराजवळील रस्ता स्थानिक ग्राम पंचायतीच्या दुर्लक्षामुळे धोकादायक झाला आहे. या धोकादायक रस्त्याच्या सुधारणेकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर एखादा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावातील गजानन महाराज मंदिरा जवळून जाणाऱ्या एका वर्दळीच्या रस्त्यावर सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्के सिमेंट काँक्रीटचे बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामावरील लोखंडी जाळी चेंबरमध्ये अडकून पडली आहे. चेंबरमध्ये पडलेली जाळी काढून ती पुन्हा व्यवस्थीत बसविणे आवश्यक आहे. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीवर गेले पंचवीस वर्षापेक्षा अधिक कालावधीत लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्याने प्रशासकीय कारभार पाहणा-या प्रशासकाचा या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने धोकादायक ठरणाऱ्या या वर्दळीच्या रस्त्याची सुधारणा करण्यात येत नाही. वाहतुकीस धोका निर्माण झालेल्या या रस्त्याची तातडीने सुधारणा करून रस्ता वाहतूक योग्य करावा अशाप्रकारची मागणी करतानाच या रस्त्यावरुन जाताना काही दुर्घटना घडलीच तर त्याची सारी जबाबदारी ही स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाची राहील अशाप्रकारचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.