रितेश देशमुखसोबत शूटींग केल्यानंतर पोहायला गेलेला डान्स आर्टीस्ट नदीत बुडाला, शोध सुरू

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या सेटवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. या सेटवरील शूटींग आटपल्यानंतर क्रूमधील काही जण जवळच असलेल्या नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी एक डान्स आर्टीस्ट सौरभ शर्मा हा नदीत बुडाला. बराच शोध घेऊनही त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे निर्मात्यांनी पुढील शूटींग थांबवले आहे.

मुंबई फिल्म कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. ”अत्यंत खेदाने शूटींग दरम्यान घडलेल्या घटनेला आम्ही दुजोरा देत आहोत. संगम माहुली मंदिर, सातारा इथे आमच्या आगामी चित्रपटाचं शूट सुरू असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांचं शूटिंग निर्विघ्न पार पडले होते. दुस-या दिवशीचे पॅकअप झाल्यानंतर, सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही आर्टीस्ट्स जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. ह्यामध्ये आमचा डान्स आर्टिस्ट हा देखील होता आणि दुर्दैवाने तो नदीपात्रात हरवला. सदर बातमी समजताच, तातडीने अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्मात्या जिनेलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले. सौरभ यांना शोधण्यासाठी विनाविलंब स्थानिक पोहणाऱ्यांची मदत घेण्यात आली आणि लगेच चित्रीकरणाच्या ड्रोनचा शोधकार्यसाठी वापर करण्यात आला. देशमुख यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी पाटील आणि इतर संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून शोधमोहीम वेगवान करण्याची विनंती केली. शोधकार्य अजूनही सुरू आहे. आम्ही या शोधकार्यात संपूर्ण सहकार्य करीत आहोत. सौरभच्या कुटुंबीयांशी आम्ही सतत संपर्कात आहोत आणि त्यांना संपूर्ण मदत करित आहोत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शूटिंग आम्ही स्थगित केलेले आहे”, असे मुंबई फिल्म कंपनी पत्रकात म्हटले आहे.