नांदेड जिल्हय़ातील 36 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत जे फरारी आरोपी आहेत व तसेच वेगवेगळय़ा गुन्हय़ात जे आरोपी आहेत, त्यांची आता खैर नाही, नवीन कायद्यानुसार आता त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलावही होऊ शकतो, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, असा सज्जड दम नांदेड जिल्हा विधि सेवा प्राधिकरण सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) दलजित कौर जज यांनी दिला आहे.
नांदेड पोलीस दलाच्या वतीने नांदेड जिल्हय़ातील 375 आरोपींसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, सूरज गुरव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना न्या.दलजित कौर जज यांनी नव्या कायद्याची कडक अंमलबजावणी होणार असून, ज्या ज्या गुन्हय़ात फरार आरोपी आहेत पिंवा गुन्हेगारी प्रवृत्तीत त्यांची सुधारणा होणार नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल. फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून, ते जर न मिळून आल्यास त्यांची मालमत्ता जप्त होणार तसेच त्याचा लिलावही होणार, त्यामुळे कायद्याला कमी समजू नका, कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, असा दमही त्यांनी दिला. नांदेड जिल्हय़ात 36 पोलीस ठाण्यात नवीन कायद्याची कडक अंमलबजावणी होणार आहे. याबाबत कारवाई कडक केली जाणार आहे. सराईत गुन्हेगारांची आता गय नाही, त्यामुळे त्यांनी नांदेडमध्ये राहायचे असेल तर कायद्यात राहा, तरच फायद्यात राहाल, कायद्याच्या विरोधात तुमची वर्तवणूक असेल तर कडक कारवाई केली जाईल. आमची तुमच्यावर नजर असणार आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी 375 आरोपींना मार्गदर्शन करताना नवीन कायदे विषयक तरतुदीची माहिती देऊन अभिलेखावरील आरोपींना त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्हय़ाचे दुष्परिणाम याबद्दल सविस्तर माहिती देऊन भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे समाजात होऊ नयेत, समाजामध्ये चांगले नागरिक म्हणून जीवन व्यतित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
न्यायालयाचा इशारा
तुम्हाला फरार आरोपी म्हणून जाहीर केले तर तुमच्या अनुपस्थितीत सदरचे खटले चालवून तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते, त्यामुळे नविन कायद्याचा अंमल कडक करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. यावेळी त्यांनी आरोपींमध्ये सुधारणेबाबत मार्गदर्शन केले आहे. फरार आरोपींनी जर दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर मोक्का कायदा देखील लागू शकतो. त्यामुळे अशा आरोपींनी याची दखल घ्यावी, जेणेकरून त्यांच्याबाबत कडक कारवाई होणार नाही यासाठी आताच त्यांनी दक्षता घेतलेली बरी, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.