
राजस्थानच्या रामगड भागात 20 ते 25 जणांच्या गटाने एका दलित कुटुंबावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओमध् कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर क्लिप व्हायरल झाली आहे. या हल्ल्यात कुटुंबातील सात जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रविवारी गोहा गावात हा हल्ला झाला. या गटाने काठ्या आणि धारदार शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. जखमींना सरकारी आणि खासगी रुग्णालयात नेण्यात आले असून यापैकी दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पीडित कुटुंबातील सदस्य मुकेश कुमार जाटव म्हणाले की, जेव्हा गटाने हल्ला केला तेव्हा ते त्यांच्या जमिनीवर मोहरीची कापणी करत होते. ‘ते काठ्या आणि शस्त्रे घेऊन आले आणि आम्हाला मारहाण करू लागले’, अशी माहिती त्यांनी दिली. संबंधित जमीन आमच्या कुटुंबाची असून आपण त्यावर काम करत होतो, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि काही संशयितांना ताब्यात घेतले. ‘जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असून आम्ही एफआयआर दाखल केला आहे आणि काही लोकांना ताब्यात घेतले आहे’, असे उपनिरीक्षक दयाचंद मीणा म्हणाले.