दक्षिणी ब्राह्मणवाडी गणेशोत्सव मंडळाचे शतक महोत्सव

माटुंगा येथील दक्षिणी ब्राह्मणवाडी गणेशोत्सव मंडळ यंदा शतक महोत्सव साजरा करीत आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या कालावधीत मंडळातर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

माटुंगा विभागातील ‘दी दक्षिणी ब्राह्मण को. हौ. सोसायटी’ची 1919 साली नोंदणी झाली. अशा या सोसायटीमधील हा शंभरावा गणेशोत्सव आहे. आधी वाडीतील रिकाम्या खोलीत गणपतीची स्थापना होत असे. 1933 पासून ब्राह्मणवाडीतील डॉ. नानासाहेब देशमुख स्मारकगृहात हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.

गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी मिरवणुकीने गणरायाचे आगमन होते. विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठा होऊन गणेशोत्सवास प्रारंभ होतो. सार्वजनिक गणपतीची सायंकाळची दणकेबाज आरती हा एक आगळा अनुभव आहे. वाडीतील बाळगोपाळ आणि हौशी कलाकारांना गणेशोत्सवात आपले कलागुण सादर करण्यासाठी स्थानिक कार्यक्रम ही एक पर्वणीच असते.

नाटक हा गणेशोत्सवाचा एक अविभाज्य भाग, वाडीतील अनेक हौशी कलाकारांचा यात सहभाग असतो. नाटकाचे दिग्दर्शन, रंगभूषा, नेपथ्य, प्रकाश योजना व प्रत्यक्ष सादरीकरण या सर्व क्षेत्रात वाडीतील सर्वांचा सक्रिय सहभाग असतो. स्थानिक कार्यक्रमातील सर्वांचा आवडता आणखी एक कार्यक्रम ‘मोगरा फुलला.’. वाडीतील हौशी गायक मराठी-हिंदी गाण्यांचे सादरीकरण करतात.

कीर्तन, मंत्रजागर, सहस्रावर्तन आणि महाप्रसाद असे कार्यक्रमदेखील उत्सवादरम्यान पार पडतात. अनेक नामवंत कीर्तनकारांची कीर्तने उत्सवात झाली आहेत. विसर्जनाच्या दिवशी विधिवत पूजा, आरती करून होते व साश्रूनयनांनी बाप्पाला निरोप दिला जातो. विसर्जनानंतर दिलेला ‘आंब्याच्या डाळी’चा प्रसाद प्रत्येक वाडीकर आग्रहाने घेऊन जातोच.