श्री जोतिबाच्या मूर्तीचे होणार संवर्धन, 21 ते 24 जानेवारीदरम्यान भाविकांना दर्शनासाठी उत्सवमूर्तीकासव चौकात ठेवणार

दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या (केदारलिंग) मूळ मूर्तीवर मंगळवार 21 जानेवारी ते शुक्रवार 24 जानेवारी अखेर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी उत्सवमूर्ती व कलश मंदिरात कासव चौकात ठेवण्यात येणार आहे.

दख्खनचा राजा श्री जोतिबाची मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी तथा प्रशासक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अमोल येडगे यांच्या वतीने मूर्तीची पाहणी करण्यासाठी वेळोवेळी पुरातत्व विभागाला कळविण्यात आले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली व पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर मूर्ती संवर्धनाबाबत अहवाल देण्यात आला होता.

या अहवालानुसार देवस्थान समितीकडून मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी महासंचालक, भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांना दि. 3 जानेवारी रोजी पत्राने कळविले होते. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली.

मूळ मूर्तीवर 21 ते 24 जानेवारीपर्यंत रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. भाविकांनी या कालावधीत कलश उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान समितीला सहकार्य करावे, अशी विनंती देवस्थान समिती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.