कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दाजीपूर ते राधानगरी रस्ता 10 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत वाहतुकीस बंद

dajipur-to-radhanagari-road-closed-for-near-about-45-days-travel-to-konkan-may-face-problem

राधानगरी मार्गे कोकणात जाणाऱ्या किंवा कोकणातून येणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नुतनीकरणाच्या कामामुळे दाजीपूर ते राधानगरी रस्ता 10 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ठिकाणी दिशादर्शक चिन्हे आणि फलक लावावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देवगड हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिट्टा-निढोरी-निपाणी कलादगी रा. मा.क्र.178 कि.मी. 66/00 ते 136/500 या रस्त्याची दुरुस्ती आणि नुतणीकरणाच्या कामामुळे दि. 10 मार्च ते 30 एप्रिल 2025 या 45 दिवसांच्या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता मोटर वाहन कायदा 115 व 116 नुसार जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करण्याचे आदेश दिले ले आहेत.

दाजीपुर ते राधानगरी मार्गावरील वाहतूक खाली नमुद केल्याप्रमाणे अन्य मार्गाने वळविण्यात येत आहे –
दाजीपूर ते राधानगरी रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करून हलक्या व लहान वाहनांकरीता बालिंगा- महे पाटी- कोते- धामोड- शिरगाव- तारळे- पडळी- कारीवडे- दाजीपुर रस्ता वापरावा, असे कळवण्यात आले आहे.

तसेच अवजड व मोठी वाहतूक या रस्त्यावरून पूर्णपणे बंद करून कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा- नांदगाव- तळेरे- वैभववाडी- गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

तसेच कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता आंबोली- आजरा- गडहिंग्लज व संकेश्वर-गडहिंग्लज- आजरा-आंबोली अशी वाहतुक वळविण्यात यावी,असेही या अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे.