कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे छत्रपती संभाजीनगर येथील ह. भ. प. नवनाथ महाराज आंधळे यांना यंदाचा दैनिक ‘सामना’चा समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर झाला आहे. 11 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीराम मंदिर, कॉटनग्रीन येथे रविवार, 7 जानेवारीला हा पुरस्कार दिला जाणार आहे.
दरवर्षी श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने पांडुरंगाचा पालखी सोहळा आणि संत संमेलन जानेवारी महिन्यात आयोजित केले जाते. यंदाचा सोहळा रविवार, 7 जानेवारीला श्रीराम मंदिर, कॉटनग्रीन येथे रंगणार आहे. याच सोहळ्यात ह. भ. प. नवनाथ महाराज आंधळे यांना समाज प्रबोधन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
ह. भ. प. नवनाथ महाराज आंधळे यांच्या घरात गेल्या चार पिढयांपासून पंढरपूर-आळंदी वारीची परंपरा आहे. वडील वारकरी होते. त्यामुळे त्यांच्यावरही घरात पूजा, ग्रंथ वाचन, हरिपाठ असे संस्कार झाले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी ह. भ. प. मीराबाई संस्थान महासांगवी तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे राहून प्राथमिक वारकरी प्रशिक्षण घेतले. 1982 पासून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे ह. भ. प. भक्तराज सारडा आणि ह. भ.प. रामभाऊ सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवचन कीर्तनाला सुरुवात केली. 1986 साली प. पू. सारडा यांनी स्वतः त्यांना टाळ देऊन उभे राहून करवून घेतली. तेव्हापासून आजपर्यंत 40 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. आयुष्यभर त्यांनी विनामूल्य कीर्तन पेले. 34 वर्षे सेवा केल्यानंतर ते एसटी महामंडळातून निवृत्त झाले. आतापर्यंत त्यांना गुणवंत कामगार पुरस्कार, महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, भारतरत्न सरदार पटेल पुरस्कार, समाज प्रबोधन पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.