आसामच्या मुलींनी मारली बाजी
अवंतिका बसरने केलेल्या 2 गोलांच्या जोरावर आसाम संघाने अंतिम लढतीत राजस्थान संघाला पराभूत करत सब-ज्युनियर राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. जेतेपदाच्या चुरशीच्या लढतीत आसामने राजस्थानविरुद्ध 3-2 अशी बाजी मारली. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. जेतेपदाच्या लढतीत पहिल्याच मिनिटामध्ये राजस्थानच्या देविका योगीने गोल करत आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र आसामच्या अवंतिका बसरने तिसऱ्या व पाचव्या मिनिटाला गोल करून आसाम संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. आसामच्या हृदिका शर्माने 9 व्या मिनिटाला गोल करून आसामची आघाडी 3-1 अशी वाढविली. मध्यंतराला आसाम संघाने 3-1 अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतरानंतर राजस्थानच्या विधी शर्माने 18व्या मिनिटाला गोल करून 3-2 अशी आघाडी कमी केली.
सितवाला जागतिक बिलियर्ड्सचा विजेता
हिंदुस्थानचा अक्वल खेळाडू ध्रुव सितवालाने गत विश्वविजेत्या पीटर गिलख्रिस्टचा 537-438 असा पराभव करताना ऑकलंड ओपन बिलियर्डस् स्पर्धा जिंकली. मुंबईस्थित क्यूइस्टचे हे पहिलेच जागतिक विजेतेपद आहे. ही स्पर्धा जागतिक बिलियर्डस रँकिंग इव्हेंटमधील एक स्पर्धा आहे. यंदाच्या वर्षात डेव्हिड कॉझियर किंवा गिलख्रिस्टव्यतिरिक्त विजेतेपद पटकावणारा ध्रुव हा पहिला खेळाडू बनला आहे.ऑकलंड ओपनची अंतिम फेरी दोन तास रंगली. त्यात 100 पेक्षा कमी गुणांच्या फरकाने जेतेपदाचा फैसला झाला. ध्रुव सितवालाने दोन शतकी ब्रेकसह प्रतिस्पर्धी गिलख्रिस्टला 537-438 असे रोखताना कारकीर्दीतील एका सर्वेत्तम जेतेपदाची नोंद केली. उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या ग्रँट हेवर्डविरुद्ध 400 गुणांच्या फरकाने विजय मिळवत ध्रुवने अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे, 281 गुणांच्या ब्रेकसह लेक्स पुआनचा पराभव करताना अक्वल मानांकित गिलख्रिस्टने जेतेपदासाठी प्रबळ दावेदारी पेश केली. मात्र, फायनलमध्ये हिंदुस्थानच्या सितवालाविरुद्ध त्याचे काहीच चालले नाही.
भव्या सोळंकीला विजेतेपद
श्रीकांत चषक आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत निर्णायक क्षणी अचूक खेळ करणारा विरारच्या विवा कॉलेजच्या भव्या सोळंकीने बाजी मारली. पहिले दोन बोर्ड हातचे निसटल्यामुळे दबावाखाली खेळणाऱ्या पार्ले टिळक विद्यालयाच्या सार्थक केरकरला अंतिम फेरीत भव्या सोळंकीने 15-0 असे सहज नमविले. परिणामी सार्थक केरकरला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित विनाशुल्क कॅरम स्पर्धेमध्ये मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, कोल्हापूर आदी जिह्यातील ज्युनियर 48 खेळाडूंनी भाग घेतला होता.