
विपराज निगमचा आंध्रला दणका
शेवटच्या 4 षटकांत 48 धावांचे अवघड लक्ष्य उत्तर प्रदेशला गाठायचे होते. तेव्हा विपराज निगमने आपल्या 8 चेंडूंतील केलेल्या 27 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार ठोकत उत्तर प्रदेशला एका षटकाआधीच विजय मिळवून दिला. विपराजसह रिंकू सिंहनेही 22 चेंडूंत 27 धावा करत उत्तर प्रदेशच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उत्तर प्रदेशने 109 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या आणि तेव्हा विपराजचे आगमन झाले. त्याने रिंकूच्या साथीने आंध्रच्या गोलंदाजीला फोडून काढले. त्याआधी आंध्रने 6 बाद 156 धावा केल्या होत्या. या डावात प्रसादने सर्वाधिक 32 धावा केल्या होत्या. फलंदाजीत चमकलेल्या विपराजने 20 धावांत 2 विकेटही टिपल्या होत्या. अष्टपैलू कामगिरीसाठी त्यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
शौर्या अंबुरेला दुहेरी सुवर्ण
ओडिशा येथे नुकत्याच पार पडलेल्या 39व्या राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत 60 मीटर धावण्याच्या तसेच 80 मीटर अडथळा शर्यतीत ठाण्याच्या शौर्या अंबुरेने अव्वल कामगिरी करीत दोन सुवर्ण पदकांची कमाई केली. तिने धावण्याची शर्यत 7.6 सेकंद या विक्रमी वेळेत पूर्ण केली. लखनौपाठोपाठ शौर्याने ओडिशा येथील ऍथलेटिक्स स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली. 16 वर्षांखालील राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत शौर्याने प्रतिस्पर्धी धावपटूंना सहज मागे टाकत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तसेच 80 मीटर अडथळा शर्यतीतही तिने वेगवान वेळ नोंदवत दुसऱ्या सुवर्ण पदकावरही शिक्कामोर्तब केले.
क्षमा पाटेकरचा अष्टपैलू खेळ
सलग दुसऱ्यांदा सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या क्षमा पाटेकरच्या अष्टपैलू खेळामुळे गतविजेत्या राजावाडी क्रिकेट क्लबने व्हिक्टरी क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत मढवी स्पोर्टस् असोसिएशन आयोजित महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. क्षमा पाटेकरच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे राजावाडी क्रिकेट क्लबने प्रतिस्पर्धी संघाचे 186 धावांचे आक्हान तीन फलंदाजांच्या मोबदल्यात 190 धावा करत विजय निश्चित केला.
संक्षिप्त धावफलक ः व्हिक्टरी क्रिकेट क्लब ः 40 षटकांत 9 बाद 186 (प्रिशा देवरुखकर 44, नंदिता त्रिवेदी 27, क्रितिका यादव 27, अलिना मुल्ला 22, क्षमा पाटेकर 3/8 दिशा पवार 2/8, ) पराभूत विरुद्ध राजावाडी क्रिकेट क्लब ः 31.3 षटकांत 3 बाद 190 (सलोनी कुष्टे 66, क्षमा पाटेकर नाबाद 55, किमया राणे 27, निव्या आंब्रे नाबाद 10, पूजा शाह 2/8, विधी मथुरिया 1/41).
ट्रान्सपायरचा विजय
ट्रान्सपायर स्पोर्ट्सने सर्वोत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर एनबीए बास्केटबॉल स्पर्धेत पुरुषांच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात फादर ऍग्नेल जिमखान्याविरुद्ध 72-56 असा सहज विजय नोंदवला. या स्पर्धेत ट्रान्सपायर स्पोर्टस्तर्फे फशिफ शेख (16 गुण), मोहसीन शेख (15 गुण), जय कुमार (14 गुण), फरदीन खान (12 गुण) आणि मोहम्मद सलीम (10 गुण) यांनी छाप पाडली.
शालेय राष्ट्रीय कबड्डी आजपासून
अमरावती – येथे 10 ते 12 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या 68व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा तगडा संघ निवडण्यात आला आहे. या स्पर्धेत देशभरातील 30पेक्षा अधिक राज्य शालेय संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून महाराष्ट्राच्या शालेय विद्यार्थ्यांकडे पाहिले जात आहे.
महाराष्ट्राचा संघ – सुदीप काळगावकर, सूरज दोरे, ध्रुव मोरे (तिघे मुंबई), आयूष पवार, शिवतेज जोग, जुनेद शेख (तिघे कोल्हापूर), अथर्व सूर्यवंशी, पियूष खळसोडे, अमित कांबळे (तिघे पुणे), आशीष यादव, प्रदीप पाल (दोघे नाशिक), साई घोलप (अमरावती).
वानखेडे स्टेडियमवर क्रिक-किट फेअरचे आयोजन
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वतीने 13 आणि 14 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर एमसीए इक्विपमेंट फेअर (क्रिक-किट फेअर) आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल. या दोन दिवसीय इक्विपमेंट फेअरच्या माध्यमातून देशभरातील आघाडीचे क्रिकेट उपकरण उत्पादकांचा मेळावा भरणार असून मुंबईसह आजूबाजूच्या जिह्यांतील क्रिकेटपटूंना अद्ययावत इक्विपमेंट खरेदी करण्याची अनोखी संधी मिळणार आहे. एमसीए क्रिक-किट फेअरचे उद्घाटन 13 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू पारस म्हांब्रे यांच्या हस्ते होणार असून ऑस्ट्रेलियन कॉन्सुल जनरल पॉल मर्फी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.