जगभरातील महत्वाच्या घडामोडी

nitin-gadkari

प्रदूषणामुळे दिल्लीला जाऊ की नको असे वाटते – गडकरी

राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या अद्याप कायम आहे. एनसीआरमधील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी श्रेणीबद्ध उपाययोजनांचा चौथा टप्पा (ग्रॅप 4) लागू करण्यात आला आहे. येथील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीवर भाष्य करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. दिल्लीत राहायला मला आवडत नाही. येथील प्रदूषणामुळे संसर्ग होतो, असे विधान गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले. प्रत्येक वेळी दिल्लीत येतो तेव्हा इथे जाऊ की नको असा मनात विचार येतो. एवढे भयंकर प्रदूषण आहे असे गडकरी म्हणाले.

फेंगलग्रस्तांना दोन हजारांची आर्थिक मदत

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे आणि अतिवृष्टीमुळे तामीळनाडूतील जनजीवन पूर्णपणे कोलमडून गेले. रस्ते वाहून गेले, घरांचे, वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. विल्लुपूरम, कुद्दालोर आणि कल्लकुरीची जिह्याला सर्वाधिक फटका बसला. या पार्श्वभूमीवर या जिह्यांमधील नागरिकांना रेशन उपलब्ध व्हावे, अन्नधान्य मिळावे यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.

महाकुंभसाठी एक हजार कोटी

उत्तर प्रदेशातील महा कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2 हजार 100 कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी 1 हजार 50 कोटी रुपयांचा पहिला हप्ता केंद्र सरकारने उत्तर प्रदेश सरकारकडे सुपूर्द केला. याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शिकवणीहून जात असलेल्या अल्पवयीन मुलीला पाहून एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलगी ही अंधेरी येथे राहते. सोमवारी मेट्रोने जात होती. मरोळ मेट्रो स्थानक येथून ती पायऱ्या उतरून जात होती. तिथे एक जण आला. त्याने तिच्याकडे पाहून अश्लील इशारा केला. त्यामुळे ती घाबरली. तिने घरी गेल्यावर याची माहिती पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

अमेरिकेत दोन हिंदुस्थानींना अटक

अमेरिकेत 40 मिलियन डॉलर्सचे कोकेन बाळगल्याप्रकरणी दोन हिंदुस्थानी वंशाच्या कॅनेडियन नागरिकांना पोलिसांनी अटक केली. वंशप्रीत सिंग (27) आणि मनप्रीत सिंग (36) अशी या दोन अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. दोघेही कॅनडातील ओंटारियो येथील रहिवासी आहेत.

ताजमहल बॉम्बने उडवण्याची धमकी

आग्रा येथील ताजमहलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. पर्यटन विभागाला धमकीचा ई-मेल मिळताच पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक, शोध श्वान पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. धमकीचा ई-मेल कुठून आला, याचा तपास आग्रा पोलीस करत आहेत.

गर्भवती महिलांसाठी ऑटो प्रवास फ्री

एका रिक्षाचालक तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ऑटोचालकाने गर्भवती महिलांसाठी ऑटो प्रवास फ्री केला आहे. गर्भवती महिलांसाठी कोणतेही भाडे घेतले जाणार नाही, असा मेसेज त्याने स्वतःच्या रिक्षात लिहिला आहे. या व्हिडीओचे आणि ऑटोचालक तरुणाचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

पुष्पाच्या एका तिकिटाची किंमत 1800 रुपये

अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षेत चित्रपट पुष्पा-2 हा 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. दिल्लीत पुष्पाचे एक तिकीट 1800 रुपयाला विकले जात आहे. मुंबई आणि बंगळुरूतही एक तिकीट 1600 रुपये आणि 1 हजार रुपयांना विकले जात आहे. कमीत कमी तिकिटाची किंमत 440 रुपयांपर्यंत आहे.

स्कोडा कायलॅकच्या बुकिंगला सुरुवात

स्कोडाची नवी कायलॅक कारच्या बुकिंगला आजपासून सुरुवात झाली आहे. कंपनीने बुकिंगसोबत कारच्या किमतीसुद्धा जाहीर केल्या आहेत. सुरुवातीची किंमत 7.89 लाख रुपये, तर टॉप हेरियंटसाठी 14.40 लाख आहे. ग्राहकांना बुकिंगनंतर या कारची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून मिळायला सुरुवात होईल.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदासाठी भरती सुरू केली आहे. भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 27 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून 17 डिसेंबर 2024 रोजी अखेरची तारीख आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर देण्यात आली आहे.

फटका! विप्रोचे शेअर 50 टक्क्यांनी घसरले

विप्रोच्या शेअरधारकांना मंगळवारी जोरदार फटका बसला. विप्रोच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना जोरदार आर्थिक फटका बसला. 50 हजार रुपयांच्या शेअर्सची किंमत एका झटक्यात 25 हजार रुपयांवर आली. सोमवारी विप्रोच्या एका शेअर्सचा भाव 585 रुपये होता.

सोन्याचे दर उतरले; चांदी पुन्हा चमकली

सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 200 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर 79 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम इतके झाले आहे. चांदीचे दर मात्र तब्बल 2 हजार 400 रुपयांनी वाढले असून 90 हजार रुपये प्रती किलो असलेली चांदी आता 92 हजार 400 रुपये प्रति किलोवर गेली आहे.