जगभरातील महत्वाच्या घडामोडी

एचडीएफसी बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर

एचडीएफसी बँकेने आपल्या कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. बँकेने कर्जदरात 5 बेस पॉइंट्सची वाढ केली आहे. बँकेच्या या निर्णयामुळे एचडीएफसी बँकेतून गृहकर्ज, पर्सनल लोन, व्यवसाय लोन, शैक्षणिक लोन घेणाऱ्या कर्जदारांचा ईएमआय हप्ता आता वाढणार आहे. एचडीएफसी बँकेचे एमसीएलआर व्याजदर आता 9.10 टक्के ते 9.45 टक्के असेल. नवीन दर आज सोमवारपासून लागू करण्यात आले आहेत. एचडीएफसी बँकेने 6 महिने आणि 3 वर्षांच्या कालावधीच्या कर्जाचे व्याजदरसुद्धा 5 बेस पॉइंट्सने वाढवले आहे.

दिल्लीत 211 फूट उंच रावणाचा पुतळा

दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची परंपरा आहे. यंदा दिल्ली येथे 211 फूट उंचीचा रावणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. पुतळ्यासाठी 40 कारागिरी दिवसरात्र मेहनत करत होते. पुतळा तयार करण्यासाठी चार महिने लागले असून 30 लाख रुपये इतका खर्च झाला आहे.

नव्या चंद्रमोहिमेची तयारी जोरात सुरू

हिंदुस्थानने पाचव्या चंद्रमोहिमेची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय अंतराळ आयोगाने लूनार पोलर एक्सप्लोरेशन मिशन म्हणजे ‘लुपेक्स’ ला मंजुरी दिली. हिंदुस्थान आणि जपान संयुक्तपणे ही मोहीम राबवतील. माणसांना चंद्रावर पाठवणे व परत आणणे हा मोहिमेचा उद्देश आहे.

‘सिंघम अगेन’चा ट्रेलर प्रदर्शित

रोहित शेट्टीचा बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर 4 मिनिटे 58 सेकंदांचा आहे. हिंदी चित्रपटातील हा सर्वात मोठा ट्रेलर आहे. याआधी कोणत्याही चित्रपटाचा ट्रेलर 4 मिनिटांपेक्षा जास्त नाही. या ऍक्शनपॅक्ड चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रवी किशन, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, रणवीर सिंह, श्वेता तिवारी आणि जॅकी श्रॉफची झलक दिसणार आहे.

अमिताभ-शाहरुखच्या नावाने 35 कोटींचा गंडा

तरुण दिसायचे असल्यास इस्रायलमधील मशीनमधून थेरेपी घ्यावी लागेल. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हेसुद्धा हीच थेरेपी घेतात. त्यामुळे ते म्हातारपणीसुद्धा तरुण दिसतात, अशी थाप मारून कानपूरमधील वृद्धांना तब्बल 35 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका जोडप्याने मोठ्या प्रमाणात लोकांना गंडवले असून पैसे घेऊन फरार झाले आहेत. या जोडप्याने लोकांना तरुण बनवण्याचा फॉर्म्युला विकून 35 कोटी रुपयांची फसवणूक केली.

कमला हॅरिस यांची आघाडी कायम

येत्या 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटीक पक्षाकडून कमला हॅरिस निवडणूक रिंगणात आहेत. प्रचारामध्ये कमला हॅरिस यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. 10 सप्टेंबरच्या प्रेसिडेन्शल डिबेटनंतर कमला हॅरिस यांचे पारडे जड झाले आहे. अशातच सात राज्ये त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहेत. कॅलिफोर्निया, टेक्सास, फ्लोरिडा, न्यूयॉर्क, इलिनोईस आणि पेनिसोल्विया ही सात राज्ये आहेत़

‘हेलेन’ वादळात 227 जणांचा मृत्यू

अमेरिकेत आलेल्या हेलेन वादळामुळे आतापर्यंत 227 जणांचा मृत्यू झाला आहे. या वादळाने दक्षिण-पूर्व भागात प्रचंड नुकसान केले आहे. या वादळामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम एका आठवड्यापासून सुरू आहे. हेलेन वादळ 26 सप्टेंबरला किनाऱ्यावर धडकले होते. फ्लोरिडाच्या उत्तर भागात या वादळाचा जबरदस्त फटका बसला. मुसळधार पावसात अनेक घरे जमीनदोस्त झाली. अनेक रस्ते वाहून गेले.