जगभरातील महत्वाच्या घडामोडी

प्रसिद्ध यूट्युबर ध्रुव राठी झाला बाबा

प्रसिद्ध यूट्युबर ध्रुव राठी बाबा झाला आहे. ध्रुवची जर्मन पत्नी ज्युलीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. शनिवारी ध्रुवने सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी दिली. यावेळी त्याने मुलाचा पहिला फोटोही शेअर केला आहे. फोटो शेअर करताना ध्रुवने कॅप्शनमध्ये म्हटले, आमच्या बेबी बॉयचे या जगात स्वागत. सोशल मीडियावरून चाहत्यांनी ध्रुव राठीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ध्रुवने 2021 मध्ये जर्मनीच्या ज्युलीसोबत लग्नगाठ बांधली होती. तेव्हापासून तो जर्मनीमध्ये राहत आहे.

नागपूर ते सिकंदराबाद धावणार वंदे भारत

देशातील 20 कोचची वंदे भारत एक्सप्रेस आता नागपूर ते सिकंदराबाद जंक्शन दरम्यान धावणार आहे. नुकतेच या ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. ही ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. 575 किमीचा प्रवास 7 तास 15 मिनिटात पूर्ण केला जाईल. नागपूरहून निघाल्यानंतर या ट्रेनला सेवाग्राम जंक्शन, चंद्रपूर, बालहर्षा, रामागुंडम, काजीपेट जंक्शन आणि सिकंदराबाद अशा एकूण
सात स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.

आयफोन 16 साठी 21 तास रांगेत

आयफोन 16 खरेदीसाठी अहमदाबादमधील उज्ज्वल शाह हा तरुण मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तब्बल 21 तास रांगेत उभा राहिला. फोन खरेदीसाठी तो मुंबईत आला होता. सोशल मीडियावर त्याने ही माहिती शेअर केली आहे. आयफोनसाठी 21 तास रांगेत उभे राहिल्याने काही नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे, तर काही नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

पटणासह 11 राज्यांत पूरसदृश्य परिस्थिती

बिहारमधील विविध जिह्यांतील नद्यांनी पाण्याची पातळी धोक्याबाहेर ओलांडली. बिहारची राजधानी पटणासह 11 जिह्यात पूरसदृश परिस्थिती उद्भवली आहे. पटणा पाण्यात गेले असून या पुराचा फटका जवळपास साडे पाच लाख लोकांना बसला आहे. पुराच्या पाण्यात अडकल्याने आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. बचाव कार्य आणि नागरिकांना मदत करण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या 13 युनिट तैनात करण्यात आल्या आहेत.

चीनच्या सुंदर गव्हर्नरला 13 वर्षांची शिक्षा

चीनच्या दक्षिण-पश्चिम चीनमधील ‘ब्युटिफूल गव्हर्नर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या झोंग यांग महिलेला 13 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. झोंग यांगने 60 मिलियन युआन म्हणजेच तब्बल 8.5 मिलियन डॉलरची लाच घेतल्याचा तसेच 58 कर्मचाऱ्यांसोबत अनैतिक लैंगिक संबंध ठेवण्याचा आरोप आहे. 52 वर्षीय झोंग यांग ही अविवाहित असून तिने पैशांसाठी पुरूष कर्मचाऱ्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा आरोप आहे. झोंग यांग ही दोषी आढळल्यानंतर तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाकिस्तानी नागरिकावर 2,95,000 रुपयांचे कर्ज

पाकिस्तानातील आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे. पाकिस्तानात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकावर सरासरी 2 लाख 95 हजार रुपयांचे (पाकिस्तानी रुपये) कर्ज झाले आहे. पाकिस्तावर एकूण कर्ज 8.36 ट्रिलियन रुपयांपर्यंत वाढून ते 2024 मध्ये 71.24 ट्रिलियनपर्यंत पोहोचले आहे. गेल्यावर्षी एकूण कर्ज 62.88 ट्रिलियन रुपये होते. पाकिस्तानवर विदेशी कर्जात झपाट्याने वाढ होत आहे.

अमेरिकेत कैद्याला दिले विषारी इंजेक्शन

अमेरिकेतील दक्षिण पॅरोलिनामधील एका कैद्याला विषारी इंजेक्शन देऊन मृत्युदंडाची शिक्षा दिली. फ्रेडी ओवेन्स असे या कैद्याचे नाव आहे. त्याने 1997 मध्ये एका स्टोअरमध्ये दरोड्यावेळी एका व्यक्तीची हत्या केली होती. दोषी ठरल्यानंतर त्याला काउंटी जेलमध्ये डांबले. या ठिकाणी त्याने एका कैद्याची हत्या केली. याप्रकरणी त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पॅरोलिनामध्ये 13 वर्षानंतर विषारी इंजेक्शन देऊन कैद्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

युक्रेनमध्ये टेलिग्राम वापरण्यास बंदी

सरकारी अधिकारी, सैन्य कर्मचारी आणि महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना टेलिग्राम अ‍ॅप वापरण्यास युक्रेन सरकारने बंदी घातली. युक्रेनची राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण परिषदेच्या सूचनेनंतर ही बंदी घातली. टेलिग्रामवरून मेसेज आणि यूजर्सच्या हालचालीवर वॉच ठेवला जावू शकतो. युक्रेन-रशिया या दोन्ही देशांत वापर वाढला आहे.

सोने आठवडाभरात 1 हजार रुपयांनी वाढले

सोन्याच्या दरात आठवड्याभरात 1 हजार रुपयांची वाढ झाली. गेल्या शनिवारी म्हणजेच सप्टेंबरला सोने 73,044 रुपये प्रति तोळा होते, ते आता 21 सप्टेंबरला 74,093 रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच अवघ्या आठवडाभरात सोन्याच्या दरात 1049 रुपयांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे चांदीच्या दरातसुद्धा 2617 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या शनिवारी चांदीचा भाव 86,100 रुपये होता, तो आता 88,917 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

इन्स्टाग्रामवरून ब्युटी फिल्टर गायब होणार

जगभरातील लोक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर करतात. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्यापूर्वी सुंदर दिसावं म्हणजे ब्युटी फिल्टरचा वापर केला जातो. मात्र मेटाने आता ब्युटी फिल्टर हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे इन्स्टावर जानेवारी 2025 पासून थर्ड पार्टी ‘ऑग्मेंटेंड रिऑलिटी फिल्टर’ उपलब्ध नसतील. महिला, विशेष करून युवती आपला फोटो चांगला दिसण्यासाठी ब्युटी फिल्टरचा वापर करतात. असे फिल्टर हे महिलांचे मानसिक स्वास्थ आणि बॉडी इमेजसंबंधी समस्यांना कारणीभूत होताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामने कोणता विचार करून हे ब्युटी फिल्टर हटवायचे ठरवले आहे, हे स्पष्ट केलेले नाही.

वोडाफोनने दोन प्लानची वैधता बदलली

वोडाफोन आयडिया कंपनीने आपल्या दोन 479 रुपये आणि 666 रुपयांच्या प्लानची वैधता कमी केली आहे. 479 रुपयांच्या प्लानमध्ये 56 दिवसांऐवजी आता 48 दिवसाची वैधता मिळणार आहे. तर 666 रुपयांच्या प्लानमध्ये 77 दिवसांऐवजी 64 दिवसांची वैधता मिळणार आहे.

अमेरिकेत हिंदुस्थानी अधिकारी मृतावस्थेत

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये हिंदुस्थानी दूतावासातील अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हिंदुस्थानी मिशनच्या आवारातच हा मृतदेह सापडला आहे. या अधिकाऱ्याने आत्महत्या केली की हत्या झाली, याचा तपास स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा करत आहेत.

सुप्रीम कोर्टाचे यूट्युबर चॅनेल पुन्हा सुरू

सर्वोच्च न्यायालयाचे हॅक करण्यात आलेल्या यूट्युब चॅनेलची सेवा पुन्हा एकदा बहाल करण्यात आली. शुक्रवारी अचानक न्यायालयातील कामकाजाचे प्रक्षेपण करणाऱ्या यूट्युब चॅनेलवर अमेरिकेतील एका क्रिप्टोकरन्सी सेवा कंपनीची जाहिरात दिसू लागली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

नोकरी! सैलमध्ये 356 पदांसाठी भरती

स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सैल)ने शिकाऊ पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरती अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस 165 पदे, तंत्रज्ञ शिकाऊ 135 पदे, पदवीधर प्रशिक्षणार्थी 53 पदासांठी भरती राबवली जात आहे. या पदांसाठी किमान वय 18 ते कमाल 28 वर्षे असायला हवे.

मुंबई महापालिकेत 178 पदांसाठी भरती

मुंबई महापालिकेत 178 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत मुंबई महानगरपालिका ‘करनिर्धारण आणि संकलन’ विभागातील गट क मधील ‘विभाग निरीक्षक’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येत आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.