जगभरातील महत्वाच्या घडामोडी

आरती सरीन ‘एएफएमएस’च्या संचालक

सर्जन व्हाइस ऍडमिरल आरती सरीन यांची सशस्त्र दल आरोग्य सेवाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्या पहिल्या महिला संचालक ठरल्या आहेत. सरीन यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्या डिसेंबर 1985 पासून सशस्त्र दलात आरोग्य सेवेत कार्यरत आहेत.

दिल्ली विमानतळावर आयफोनची तस्करी

दिल्ली विमानतळावर 26 आयफोन आणि 26 आयफोन प्रो मॅक्सची तस्करी केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली. ही महिला हाँगकाँगहून आली होती. आयफोन 16 सीरिज मागील महिन्यात लॉन्च करण्यात आली. आयफोन 16 प्रो मॅक्स हा या सीरिजमधील सर्वात प्रीमियम फ्लॅगशिप फोन आहे. हे सर्व फोन एका छोट्या पिशवीत लपवून ठेवले होते. तसेच त्यावर टिश्यू पेपर गुंडाळले होते. झडतीदरम्यान तिच्या बॅगमधून हे फोन सापडले.

इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 25 टक्के वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभरीपार गेल्याने अनेक जण आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याला पसंती देत आहेत. सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) वार्षिक विक्रीत 25 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 1.19 लाख ईव्ही वाहनांची विक्री झाली होती, तर या वर्षी हा आकडा 1.49 लाखांवर पोहोचला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 1 टक्का वाढ झाली आहे.

ड्रायव्हरमुळे ‘ओला’ला पाच लाखांचा दंड

ओला कॅबमधून प्रवास करताना एका महिलेकडे पाहून अश्लिलकृत्य केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने ओला कंपनीला तब्बल 5 लाखांचा दंड ठोठावला आहे. 2018 मध्ये ओलाचालकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता. या प्रकरणी ओला कंपनीकडूनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेले. कोर्टाने पीडितेला पाच लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश कंपनीला दिले.

1.73 लाख कोटींचे जीएसटी कलेक्शन

सप्टेंबर महिन्यातील जीएसटी कलेक्शनचा डेटा समोर आला आहे. या महिन्यातील कलेक्शन 1.73 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षी याच महिन्यात हे कलेक्शन 1.63 लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत कलेक्शन 6.5 टक्के अधिक आहे. ऑगस्टमध्ये जीएसटी कलेक्शन 1.74 लाख कोटी होते. जीएसटी विभागाकडून 20,458 कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आल्यानंतर एक वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत 31 टक्के अधिक आहे.

2 हजार रुपयांच्या 2 टक्के नोटा येणे बाकी

2 हजार रुपयांच्या 98 टक्के नोटा आरबीआयकडे आल्या असून अद्याप 2 टक्के नोटा येणे बाकी आहेत, अशी नवी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी दिली. 2 टक्के नोटांची किंमत जवळपास 7 हजार 117 कोटी रुपये इतकी आहे. 19 मे 2023 रोजी क्लीन नोट पॉलिसीअंतर्गत या नोटा परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मे 2023 मध्ये 3.56 लाख कोटी रुपयांच्या नोटा बाजारात होत्या. परंतु अजूनही 7 हजार कोटी रुपयांच्या नोटा आरबीआयकडे पोहोचल्या नाहीत.

फायटर जेट सुखोईला मिळाले देसी इंजिन

हिंदुस्थानी वायुदलाला हिंदुस्थानी एअरोनॉटिक्स लिमिटेडने सुखोई फायटर जेटचे पहिले एएल-31 एफपी इंजिन सोपवले. हे इंजिन हिंदुस्थानात तयार करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात संरक्षण मंत्रालयाने सुखोई फायटर जेटसाठी 240 एअरो इंजिनच्या खरेदीसाठी एचएएलसोबत करार केला होता. या कराराची एकूण किंमत 26 हजार कोटींहून अधिक आहे. या इंजिनची निर्मिती एचएएलच्या कोरापूट डिव्हिजनकडून केली जात आहे. तसेच हा विभाग अन्य महत्त्वाची भूमिका बजावत आहे.