जगभरातील महत्वाच्या घडामोडी

मराठी शब्द चुकीचा उच्चारल्याने अमिताभ बच्चन यांनी मागितली महाराष्ट्राची माफी

‘बिग बी’ अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. तसेच सोशल मीडियावरही सक्रिय असून चाहत्यांशी वरचेवर संवाद साधताना दिसतात. अशाच पद्धतीने अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. इन्स्टाग्रामवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत बिग बींनी ‘मी कचरा करणार नाही’ असे मराठीत म्हणत चाहत्यांनाही कचरा न करण्याचे आवाहन केले होते. मात्र व्हिडीओत बिग बींकडून मराठी शब्दाचा उच्चार चुकीचा झाला होता. त्याबद्दल त्यांनी आज माफी मागितली. माझे मित्र सुदेश भोसले यांनी मी उच्चार चुकीचा केल्याचे सांगितले. त्यामुळे हा व्हिडीओ मी पुन्हा करत आहे, असे अमिताभ म्हणाले.

पोपटाच्या गळ्यातून काढले 20 ग्रॅमचे ट्यूमर

मध्य प्रदेशच्या सतना जिह्यात एका पोपटावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. बेटू असे या पोपटाचे नाव असून त्याच्या गळ्यातून 20 ग्रॅमचे ट्यूमर काढले. दोन तास ही शस्त्रक्रिया चालली. सहा महिन्यांपूर्वी पोपटाच्या गळ्यावर मालक चंद्रभान विश्वकर्मा यांना गाठ दिसली. हळूहळू ती वाढत गेली. त्यामुळे पोपटाला त्रास होऊ लागला. यानंतर विश्वकर्मा यांनी पोपटाला जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. पोपटाचे वय 21 वर्षे असल्याचे समजते. पशुवैद्यक डॉ. बालेंद्र सिंह म्हणाले, गळ्यातील गाठीमुळे पोपटाला खायला त्रास व्हायचा. पोपटाचे वजन 98 ग्रॅम होते. त्याच्या गळ्यातून 20 ग्रॅमची गाठ काढण्यात आली. ती वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. ही एक अवघड शस्त्रक्रिया होती. पोपटाची प्रकृती आता चांगली आहे.

मेंदूची शस्त्रक्रिया सुरू असताना बघितला एनटीआरचा सिनेमा

आंध्र प्रदेशच्या काकीनाडा रुग्णालयात डॉक्टरांच्या एका टीमने एका महिलेवर ब्रेन ट्यूमरवर अवघड शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करताना ही महिला ज्युनिअर एनटीआरचा सिनेमा पाहत होती. वैद्यकीय भाषेत याला डिप ब्रेन स्टिम्युलेशन किंवा अवेक व्रॅनीओटॉमी असे म्हटले जाते. यामध्ये रुग्णाला अवघड शस्त्रक्रियेदरम्यान जागे ठेवले जाते. त्याचा मेंदू सक्रिय ठेवला जातो. ए. अनंतलक्ष्मी यांच्या मेंदूत गाठ आल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. या वेळी त्यांना ज्युनिअर एनटीआरचा ‘अधुर्स’ हा सिनेमा दाखवण्यात आला.

उपासमारीमुळे 200 हत्ती मारणार

झिम्बाब्वेमध्ये उपासमारीचा सामना करण्यासाठी सरकारने हत्तींना मारण्याचे आदेश दिले आहेत. झिम्बाब्वेच्या 4 जिह्यांमध्ये 200 हत्ती मारले जातील आणि त्यांचे मांस विविध समुदायांमध्ये वाटले जाईल. झिम्बाब्वे पार्क्स आणि वन्यजीव प्राधिकरणाने याची पुष्टी केली आहे. झिम्बाब्वे गेल्या 4 दशकांतील सर्वात मोठ्या दुष्काळाचा सामना करत आहे.

हिमाचलमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी

हिमाचल प्रदेशात गेल्या तीन ते चार दिवसांत पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे लाहौल-स्पिती आणि किनौरच्या तापमानात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी पडली आहे. तर पावसामुळे 50 रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. राज्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

शस्त्रक्रिया चुकल्याने अधिकाऱ्याचा मृत्यू

शस्त्रक्रिया चुकल्याने प्रियांका बिश्नोई या 33 वर्षीय सहाय्यक जिल्हाधिकारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रियांका बिश्नोई या राजस्थान प्रशासकीय सेवा अधिकारी आणि त्यानंतर जोधरूपच्या एसीएम म्हणून कार्यरत होत्या. प्रियांका यांच्यावर काही दिवसांपूर्वी गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाली होती.

गाढवाचा मृत्यू अन् 55 जणांवर गुन्हा

गावातील ददन रजक नावाच्या व्यक्तीकडे चार गाढवं आहेत. आठवडाभरापूर्वी विजेचा खांबातून करंट लागून एका गाढवाचा मृत्यू झाला होता. वीजभट्टीकडे ओझं वाहण्यासाठी गाढवांचा उपयोग होतो. ददन रजक गाढवांना घेऊन घरी परतत होते. गावात विजेचा पोल आहे. पाऊस पडल्याने पाणी साचले होते.

कोलकात्यातील आंदोलक डॉक्टर उद्यापासून अंशतः कामावर परतणार

कर रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येनंतर काम बंद केलेल्या आंदोलक डॉक्टरांनी शनिवारपासून अंशतः वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. या डॉक्टरला न्याय मिळावा यासाठीची आमची लढाई संपलेली नाही. पण, आम्ही राज्यातील पूरग्रस्त लोकांना वैद्यकीय सहाय्य पुरवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलू, असे या आंदोलकांनी म्हटले आहे. राज्य सरकार संचलित रुग्णालयांमधील आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवांसाठी आम्ही शनिवारपासून अंशतः कामावर रुजू होऊ, असे या डॉक्टरांनी सांगितले.

लेबनॉनमध्ये मोबाईल, वॉकीटॉकी आणि पेजरची दहशत

अचानक पेजर, वॉकीटॉकी, तसेच सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा स्फोट झाल्यामुळे आता लेबनॉनमध्ये मोबाईल, वॉकीटॉकी आणि पेजरची दहशत प्रचंड वाढली आहे. मोबाईल हातात घ्यायलाही लोक घाबरत आहेत. स्फोटानंतर मोबाईल, पेजरसह विविध उपकरणांमधील बॅटरी काढून फेकण्याचे आदेश हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने आपल्या लोकांना दिले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या स्फोटांमध्ये 37 लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल 2 हजार 300हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान, वॉकीटॉकी उत्पादक जपानी कंपनी आयकॉम इन्कडॉटने लेबनॉनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वॉकीटॉकीचे उत्पादन 10 वर्षांपूर्वी थांबवल्याचे म्हटले आहे.