जगभरातील महत्वाच्या घडामोडी

डल्लेवाल उपोषण; आज सुनावणी

शेतमालाला किमान हमीभाव आणि विविध मागण्यांसाठी गेल्या 35 दिवसांपासून खनौरी बॉर्डरवर उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांना रुग्णालयात दाखल करण्याचा पंजाब सरकारचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला 31 डिसेंबरपूर्वी डल्लेवाल यांना तात्पुरत्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यावर 31 डिसेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे.

महिला आयोगाची समिती अण्णा विद्यापीठात

अण्णा विद्यापीठ बलात्कार प्रकरणाचा तपास सुरू झाला असून महिला आयोगाने स्थापन केलेले तथ्य शोध पथक आज विद्यापीठात पोहोचले. हे पथक विद्यापीठातील अधिकारी, पीडिता, तिचे कुटुंब आणि स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधणार आहे. 23 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता अण्णा विद्यापीछात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता.

पाकिस्तानातील 300 हिंदूंना हवे दिल्लीचे मतदार ओळखपत्र

सीएए अर्थात नागरित्व सुधारणा कायद्यांतर्गत नागरिकत्व मिळाल्यानंतर पाकिस्तानातील सुमारे 300 हिंदूंनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी अर्ज केला आहे. यंदाच्या मे महिन्यात त्यांना नागरिकत्व देण्यात आले होते. शहरात मजनू का टिला आणि आदर्श नगर भागात पाकिस्तान सोडून आलेल्या हिंदूंच्या वस्त्या आहेत.

फुटीरतावाद्यांचे चार बंकर उद्ध्वस्त

हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या फुटीरतावाद्यांचे चार बंकर उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा दलांना यश आले. आज मणिपूरच्या इम्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिह्यात सुरक्षा दलांनी धडक कारवाई केली. येथील काही भागांत दोन दिवसांपासून शोधमोहीम राबवण्यात आली. सलग सहाव्या दिवशी गोळीबाराची घटना घडली. यात एक पोलीस कर्मचारी आणि एका महिलेसह चारजण जखमी झाले.