जगभरातील महत्वाच्या घडामोडी

पायलटच्या चुकीमुळेच बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला पायलटच्या चुकीमुळे अपघात झाल्याचा मोठा खुलासा करण्यात आला आहे. खराब हवामानामुळे अपघात घडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. परंतु आता अपघाताच्या तीन वर्षांनंतर अपघातात मानवी चूक असल्याचे सांगण्यात येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीच्या अहवालात याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. जनरल रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह सशस्त्र दलाच्या 12 कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला होता. 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हा अपघात झाला होता. मंगळवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या अहवालात हवाई दलाच्या विमानांच्या अपघातांच्या संख्येबाबतचा डेटा सामायिक केला.

‘देशदूत’चे संस्थापक देवकिसन सारडा यांचे निधन

येथील दैनिक देशदूतचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक देवकिसन सारडा (92) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सारडा यांनी नाशिकच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सिन्नर व्यापारी बँक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, जळगाव जिल्हा सहकारी बँक, नाईस, निमा, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे विविध पदे भूषवली आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

उत्तर प्रदेशात कथाकथन कार्यक्रमात चेंगराचेंगरी

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथाकथन कार्यक्रमात आज दुपारी अचानक चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक महिला तसेच वृद्ध नागरिक जखमी झाले. दुपारी 1 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी तब्बल एक लाख लोक कार्यक्रमाला जमले होते. कथा सुरू झाल्यानंतर लोक धावतपळत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले. एकाचवेळी सर्वजण आतमध्ये घुसल्यामुळे गोंधळ उडाला. शताब्दी नगर येथे सुरू असलेल्या या कथाकथन कार्यक्रमाला रोज सुमारे दीड लाख लोक येत आहेत.

आसाममध्ये युथ काँग्रेसच्या अध्यक्षाला अटक

मणिपूर हिंसाचार आणि अदानी लाचखोरी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या मृदुल इस्लाम या काँग्रेस कार्यकर्त्याचा पोलिसांनी केलेल्या अश्रुधुराच्या माऱ्यामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. याविरोधात आंदोलन करणारे युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना आसाम पोलिसांनी आज अटक केली. मृदुल इस्लामच्या मृत्यू प्रकरणी दिसपूरसह राज्यभरात आंदोलन करण्यात येणार होते. त्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणी विरोधकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत असून ही कारवाई तत्काळ मागे घेण्याची मागणी होत आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला बनवले न्यायमूर्ती

उत्तर प्रदेशात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशपदी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप असणाऱ्या प्रदीप कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे. या व्यक्तीला अलाहाबाद न्यायालयाने निर्दोष मुक्त केले सात वर्षांपूर्वी या व्यक्तीवरील आरोपांमुळे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यास नकार देण्यात आला होता.

12 जानेवारीला वॉटर किंगडम मॅरेथॉनचे आयोजन

नवीन वर्षाची सुरुवात आरोग्य आणि निरोगीपणाच्या उद्दिष्टाने व्हावी यासाठी 12 जानेवारी 2025 रोजी पहिल्यावहिल्या ‘वॉटर किंगडम’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 3 किमी, 5 किमी आणि 10 किमी अशा तीन श्रेणींमध्ये ही स्पर्धा पार पडेल. डॉन बॉस्को सिग्नल आणि मंडपेश्वर आयसी कॉलनी येथून स्पर्धक धावतील. इच्छुक स्पर्धक 9 आणि 10 जानेवारीला ब्रेह्यू रेस्टॉरंटमधून सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत बिब एक्स्पोमधून त्यांचे ‘रनर किट’ घेऊ शकतात. अधिक माहिती http://www.waterkingdom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.