राम मंदिरासाठी सोन्याचा कळस
अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेला आता पुढील महिन्यात वर्ष पूर्ण होईल. राम मंदिराचे संपूर्ण बांधकाम होण्याआधीच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. वर्षभरानंतर आता काम पूर्णत्वाकडे गेले आहे. मुख्य रामलल्लाच्या मंदिराचा दहा फुटांचा कळस हा सोन्याने मढवला जाणार आहे, अशी माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. राम मंदिराचे काम लवकर व्हावे यासाठी कामगारांची संख्या वाढवण्यात आली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सोने 71 हजार रुपये तोळा
सोने खरेदीसाठी हा संपूर्ण आठवडा चांगला राहिला. आठवड्यात सोन्याची किंमत साडेपाचशे रुपये स्वस्त झाली. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव आता 71 हजार 150 रुपये तोळा झाला आहे. सोने 76 हजारांच्या पुढे गेले होते. तर चांदीचा भाव प्रति किलो 90 हजार 820 रुपयांवर पोहोचली आहे. 29 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 76 हजार 740 रुपये होता. तर गेल्या आठवड्यात चांदी 89,383 रुपये होती. ती आता 90 हजार 820 रुपये प्रति किलोवर आली आहे.
मार्शल लॉला कडाडून विरोध
दक्षिण कोरियात राष्ट्रपती यून सुक योल यांनी अचानक मार्शल लॉ लागू केला. राष्ट्रपती यून यांच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. दक्षिण कोरियातील मुख्य विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते ली जै मेऊंग यांनी आपल्या सदस्यांसह मार्शल लॉ निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला. यावेळी सदस्यांनी निषेधांचे बॅनर हाती घेतले. यून सुक योल यांनी या निर्णयाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली आहे.
14 मच्छीमारांना श्रीलंकेत अटक
हिंदुस्थानमधील 14 मच्छीमारांना श्रीलंकेच्या हद्दीत गेल्यावरून श्रीलंका नौदलाकडून अटक करण्यात आली आहे. या मच्छीमारांच्या दोन बोटीसुद्धा नौदलाने जप्त केल्या आहेत. ईशान्येकडील मन्नार जिह्याच्या किनाऱ्याजवळ बुधवारी ही अटक करण्यात आली. या अटकेमुळे 2024 मध्ये आतापर्यंत 529 हिंदुस्थानी मच्छीमारांना अटक करण्यात आली. तसेच 68 ट्रॉलर जप्त करण्यात आले आहेत, असे श्रीलंकेच्या नौदलाने सांगितले.
नारायण मूर्तींनी खरेदी केले 50 कोटींचे अपार्टमेंट
आयटी सेक्टरची प्रसिद्ध कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी बंगळुरू येथील किंगफिशर टॉवर्समध्ये एक लग्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत 50 कोटी रुपये इतकी आहे. 16 व्या मजल्यावर असलेले हे अपार्टमेंट 8400 वर्ग फूट असून यात चार बेडरूम आणि पाच कार पार्किंगचा समावेश आहे.
महाकुंभ सुरक्षेसाठी 15 अश्व ड्युटी बजावणार
उत्तर प्रदेशातील प्रयाग महाकुंभ सुरक्षेसाठी डॉ. भीमराव आंबेडकर पोलीस अकादमीच्या घोड्यांची ड्युटी लावण्यात येणार आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी माउंटेन पोलीस 15 घोड्यांना पाठवणार आहे. यात मोंटिना, रिमझिम, चेतक यासारख्या घोड्यांचा समावेश आहे. घोड्यांसोबत 15 जवानसुद्धा असणार आहेत. महाकुंभमध्ये गर्दीला रोखण्यासाठी अकादमीने घोड्यांचा अभ्यास सुरू केला आहे. घोडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना 12 जानेवारीला रवाना केले जाणार आहे. प्रयागराज येथे 12 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या महाकुंभसाठी 40 कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.
सावलिया सेठ मंदिरात 35 कोटींचे दान
राजस्थानमधील चित्तोडगढ येथे असलेल्या सावलिया सेठ मंदिरात भक्तांनी भरभरून दान केले आहे. भंडाऱ्यात 34 कोटी 91 लाख रुपये रोख रक्कम, अडीच किलो सोने आणि 188 किलो चांदी दान केली. सावलिया सेठ मंदिरात आलेल्या दानाची मोजणी मागील सहा दिवसांपासून सुरू होती. मागील दोन महिन्यांपूर्वी केलेल्या मोजणीत 17 कोटी रुपयांचे सोने आले होते.
7 राज्यांत 28 नवोदय विद्यालय उघडणार
केंद्र सरकारने देशातील 7 राज्यांत 28 जवाहर नवोदय विद्यालय उघडण्याची योजना बनवली आहे. या विद्यालयाच्या विस्तारासाठी 8231 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. कर्नाटकातील 8, मणिपूरमधील 3, आसाममधील 6, अरुणाचल प्रदेशमधील 8 ठिकाणी, पश्चिम बंगालमधील दोन ठिकाणी तर महाराष्ट्रात केवळ एकाच ठिकाणी ठाणे जिह्यात नवोदय विद्यालय उघडणार आहे.
ब्लॅकमेल करत प्रियकराने उकळले 2.5 कोटी
खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका प्रियकराने आपल्या प्रेयसीकडून तब्बल 2.5 कोटी रुपये उकळले. ही धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये उघडकीस आली आहे. आरोपी आणि पीडित मुलीचे शिक्षण एकत्रित झालेले आहे. पीडितेला लग्नाचे आश्वासन देत फिरायला नेले होते. त्यावेळी आरोपीने प्रेयसीचे काही फोटो आणि व्हिडीओ काढले होते.