मुंबईतील महत्वाच्या घडामोडी

एका अ‍ॅपवर मिळणार वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाची माहिती

मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयातील सर्व पशु-पक्ष्यांच्या निवासस्थानापासून वनस्पतींच्या नावासह तिची वैशिष्ट्ये एका अ‍ॅपवर समजणार आहेत. याबाबत आज ‘मुंबई बोटॅनिकल गार्डन अँड झू अ‍ॅप’चे लोकार्पण फोर्ट येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. उद्यान व प्राणी संग्रहालयात शेकडो प्रकारचे पशू-पक्षी, वनस्पती आहेत. या वनस्पतींची माहिती या ठिकाणी येणारे पर्यटक आणि मुंबईकरांना व्हावी यासाठी सेव्ह राणीबाग बोटॅनिकल गार्डन फाऊंडेशन आणि नगर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या लोकार्पणप्रसंगी माजी मुख्य सचिव द. म. सुखथनकर, फिरोज गोदरेज आणि उद्यान संचालक डॉ. संजय त्रिपाठी आदी उपस्थित होते.

वरळीत आज सलग 144वे रक्तदान शिबीर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाल्यानंतर वरळीतील शिवसेना शाखेत दरमहा 17 तारखेस रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. मंगळवार, 17 डिसेंबर 2024 रोजी सलग 144वे रक्तदान शिबीर सकाळी 10 ते 2 या दरम्यान वरळी नाका येथील शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आले असून इच्छुक रक्तदात्यांनी 9821581860 या क्रमांकावर आयोजक माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्याशी संपर्क साधावा.

1831 वाहन चालकांवर कारवाई

शहरात अपघाताच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहनचालकांविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली आणि वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांना कारवाईचा दणका दिला. रविवारी राबवलेल्या विशेष मोहिमेत 1831 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. रात्री 12.05 पासून पहाटे 5 वाजेपर्यंत विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत 6300 हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. कुर्ला बेस्ट बसच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे.