मुंबईतील महत्वाच्या घडामोडी

दक्षिण मुंबईत मराठी जिमखाना

मुंबईतील इस्लाम, पारशी, जैन जिमखान्याच्या धर्तीवर दक्षिण मुंबईत मराठी जिमखाना स्थापन करण्याच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुंबईतील मराठी माणसाचा ठसा कायम राहावा यासासाठी मुंबईत तेही दक्षिण मुंबई परिसरात मराठी जिमखाना सुरू होणार आहे. या जिमखान्यासाठी योग्य जागेचा शोध सुरू आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेला जागा शोध घेण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

कारची मोटारसायकला धडक; मुलाचा मृत्यू

पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर पूर्व येथे भरधाव वेगातील कारने मोटारसायकलला दिलेल्या अपघातात आदित्य वेलणकर या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला आहे. आदित्य आणि त्याचा मित्र करण हे दहिसर येथील गॅरेजमध्ये गेले होते. ते दोघे पुन्हा कांदिवलीच्या दिशेने येत असताना शैलेंद्र हायस्कूलसमोरील ओव्हर ब्रिजवर पांढऱ्या रंगाच्या कारने कट मारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. चालकाने हॉर्न न वाजवल्यामुळे त्याची कार दुचाकीला घासली आणि हा अपघात झाला. जखमी आदित्यला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

एसटी प्रवासात अडचण आल्यास आता थेट आगार प्रमुखाकडे तक्रार

एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण आल्यास त्यांना त्याबाबत थेट आगार प्रमुखांकडे तक्रार करता येणार आहे. एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत असेल, चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असेल, वाहक उद्धटपणे बोलला किंवा वाहकाने योग्य ठिकाणी उतरवले नाही अशा काही तक्रारी असतील तर आगार प्रमुखांना फोन करता येणार आहे. एसटी बसमध्ये चालकाच्या मागील बाजूस संबंधित बस ज्या आगारातील आहे, त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक, तसेच तेथील स्थानक प्रमुख व कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक लिहिण्यात यावा. प्रवाशांनी केलेल्या तक्ररींचे तातडीने निवारण करावे, अशा सूचना एसटी महामंडळाने सर्व आगार प्रमुखांना दिल्या आहेत.