मतदान ओळखपत्रामुळे झोपडी झाली पात्र
मतदान ओळखपत्रामुळे एका महिलेची झोपडी पात्र असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 2000 पूर्वीची कागदपत्रे नाहीत, असे नमूद करत जिल्हाधिकारी, अपील प्राधिकरण व एसआरएने या महिलेची झोपडी अपात्र ठरवली होती. त्यामुळे पुनर्विकासात मिळालेल्या घरावर गदा येणार होती. न्यायालयाने या महिलेला दिलासा दिला आहे. मारिया गोमस यांनी ही याचिका केली होती. 2007 मध्ये त्यांची झोपडी पात्र ठरली होती. एसआरएच्या यादीत त्यांचे नाव होते. एकाने त्यांच्या पात्रतेवर आक्षेप घेतला. एसआरएने त्यांच्या कागदपत्रांची नव्याने छाननी केली. 2000 पूर्वीची कागदपत्रे नसल्याचा ठपका ठेवत त्यांची झोपडी प्रशासनाने अपात्र ठरवली. त्याविरोधात दाखल केलेली याचिका न्या. माधव जामदार यांच्या एकल पीठाने मंजूर केली.
व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन पैसे उकळले
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पोलीस पुत्राची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदाराला इन्स्टाग्रामवर एक रिक्वेस्ट स्वीकारली. काही वेळाने त्यांचा व्हॉट्सऍप नंबर घेण्यात आला. रात्री त्यांना एका महिलेने फोन केला. फोनवर ती नकोसे कृत्य करू लागली. त्यानंतर तिने पैशाची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर अश्लील व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी दिली. त्याच्याकडून दहा हजारांची मागणी केली. पैसे दिल्यावर तो व्हिडीओ डिलीट करते असे सांगितले. भीतीपोटी त्याने पैसे दिले. पैसे पाठवल्यानंतर त्याच्याकडे आणखी पैशाची मागणी केली. या प्रकरणी त्याने दादर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.
40 लाखांचे दागिने घेऊन कामगार पसार
पॉलिशसाठी दिलेले 40 लाखांचे दागिने घेऊन कारागीर पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तक्रारदाराचा काळबादेवी येथे सोन्याचे दागिने पॉलिशचा कारखाना आहे. पसार झालेला कामगार हा गेल्या चार महिन्यांपासून तेथे दागिन्याला पॉलिश करण्याचे काम करायचा. दोन दिवसांपूर्वी तक्रारदाराने त्याच्याकडे 40 लाख रुपयांचे दागिने दिले. ते दागिने घेऊन कारखान्यात आला व त्याचा सहकारी हा बाहेर गेला. कारखान्यात कोणी नसल्याचे पाहून तो कामगार दागिने घेऊन पसार झाला. काही वेळाने तक्रारदार हे कारखान्यात आले तेव्हा तो कामगार कारखान्यात नव्हता. त्याचा फोन बंद होता. तसेच कारखान्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा तो दागिने घेऊन बाहेर जात असताना दिसला. दागिने चोरीप्रकरणी त्याने एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
पार्ल्यात आज फुटणार एक हजार नारळ
सणांमध्ये नारळी पौर्णिमेला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. ते जपण्यासाठी शिवसेना नेहमीच आघाडीवर असते. उद्या नारळी पौर्णिमेदिनी विलेपार्ल्यात एक हजार नारळ फुटणार आहेत. निमित्त आहे शिवसेनेने आयोजित केलेल्या भव्य नारळी फोडी स्पर्धेचे. शिवसेना नेते, आमदार ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाने विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी शिवसेना शाखा क्रमांक 84 च्या वतीने कोलडोंगरी, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हनुमान मंदिराजवळ सकाळी 11 वाजता ही नारळ फोडी स्पर्धा आयोजित केली आहे. दरवर्षी या स्पर्धेनिमित्त हिंदू परंपरा जपली जाते. गेल्या वर्षी या स्पर्धेत 700 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यंदा तो आकडा एक हजारावर जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेतील विजेत्यांचा आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरव केला जाणार आहे. हितेश खानविलकर, जितेंद्र शिर्के आणि अमित जोशी हे स्पर्धेचे व्यवस्थापक आहेत.
मानखुर्दमध्ये देशातील पहिले ‘अहिल्या भवन’
मराठा साम्राज्यातील अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, कुशल प्रशासक आणि कार्यक्षम लोकनेत्या असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श समाजापुढे ठेवण्यासाठी, त्यांची शिकवण जपण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्या भवन’ मानखुर्दमध्ये उभारण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून हे भवन उभारले जाणार असून त्यासाठी 47 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 35 हजार 500 स्क्वेअर मीटर जागेवर हे भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक व कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्रांच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या ठिकाणी स्थापन होणार आहेत.
रामगिरी महाराजांवर मुंबईतही गुन्हे दाखल
मुस्लिम बांधकांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज याच्या विरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे. रामगिरी महाराजांवर पायधुनी आणि माहीम पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसापूर्वी नाशिकच्या सिन्नर येथे अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन केले होते. सप्ताहाचे प्रवचन सुरु असताना रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी मोह्हमद पैगंबर याचे जीवन चारित्र्याकर वक्तव्य केले. धार्मिक भाकना दुखावल्याने आणि दोन धर्मात तेढ निर्माण केल्याने रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मंकीपॉक्स साथीविषयी तयारीचा आढावा
मंकीपॉक्स साथीचा संभाव्य फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला. असे रुग्ण तातडीने हुडकण्यासाठी देशातील प्रवेशबिंदूंवर अधिक सतर्क तपासणी करण्यावर या वेळी विचार झाला.