शशिकांत शिंदेंचे स्टेअरिंग नरेंद्र पाटलांच्या हाती
थाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करून आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळविले. फडणवीसांच्या अत्यंत जवळचे समजले जाणाऱ्या नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्या गाडीचे स्टेअरिंग हाती घेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात पोहचवले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे उमेदवार शंभुराज देसाई यांचा अर्ज भरतानाही पाटणमध्ये नरेंद्र पाटील उपस्थित होते.
वादग्रस्त खेडकर कुटुंब पुन्हा चर्चेत
पुण्याच्या वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी खूप चर्चेत होते. यूपीएससीने पूजा खेडकरवर कायमची बंदी घातली आहे. पूजामुळे खेडकर कुटुंबाचे अनेक कारनामे उघड झाले. अशातच आता पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी शेवगाव मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. लोकसभेला प्रतिज्ञापत्रात पत्नीचा उल्लेख केला होता मात्र विधानसभेला तो टाळण्यात आला. यामुळे खेडकर कुटुंब पुन्हा चर्चेत आलेय.
पुसदमध्ये सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात
पुसद येथील नाईक कुटुंबीयांत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक यांच्या दोन्ही मुलांनी एकमेकांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या बंजाराबहुल मतदारसंघात मतांचे विभाजन होण्याची भीती व्यक्त होत आहे. आमदार इंद्रनील नाईक यांनी अजित पवार गटाकडून, तर त्यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सुधाकर शृंगारे म्हणाले, मला भाजपनेच पाडले
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस प्रवेशानंतर शृंगारे यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीत आपला प्रचार भाजपच्या कोणत्याच नेत्याने केला नाही. माझा पराभव हा भाजपच्या स्थानिक नेत्यांनीच केला, असा आरोप करत आता एकालाही सोडणार नाही असा इशाराच शृंगारे यांनी दिला.
करुणा मुंडेंचे सूचक म्हणाले, सह्या आमच्या नाहीत
परळी विधानसभा मतदारसंघातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने करुणा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्जाची छाननी झाली. यावेळी करुणा मुंडे यांच्या अर्जावर सूचकांच्या नावापुढे केलेल्या सह्या आपल्या नसल्याचे सूचकांनी छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे करुणा मुंडे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.