सिंगापूरचे न्यायाधीश मुंबई हायकोर्टात
सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व अन्य दोन न्यायाधीशांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. सिंगापूरचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन, न्यायमूर्ती रमेश कन्नन, न्यायमूर्ती अॅण्ड्रे मणिअम यांनी उच्च न्यायालयातील तीन विशेष खंडपीठामध्ये सहभाग घेतला. सरन्यायाधीश मेनन यांनी मराठा आरक्षणाच्या सुनावणीत सहभाग घेतला होता.
लाडकी बहिण लाडके भाऊ सत्तेत येण्याची वाट पाहताहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिंधे सरकारचा ‘लाडकी बहीण’ योजनेवरून चांगलाच समाचार घेतला. लाडक्या बहिणीची ओढाताण सुरू आहे, तीन भाऊ ओढाताण करत आहेत. पण तिचे प्रेम विरोधकांवर आहे. कधी हे लोक जातात आणि आपले लाडके भाऊ सत्तेत येतात याची ती वाट पाहतेय, अशी खिल्ली त्यांनी उडवली. अर्थसंकल्पात ही योजना नाही. शेजारून कागद आला आणि ही योजना आली, विचार न करता ही योजना आणली आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
अत्राम यांची लेकीला धमकी
अजितदादांच्या गटातील मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची लाडकी विवाहित लेक भाग्यश्री हीसुद्धा शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यावरून अत्राम हे अत्यंत संतप्त आहेत. बापाची झाली नाही तर दुसऱ्याची कशी होईल, असे म्हणत त्यांनी भाग्यश्रीला जावयासकट नदीत फेकेन अशी धमकी दिली आहे. चंद्रपुरातील अहेरी मतदारसंघातून अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री हलगेकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
सौंदर्य उत्पादनांची बाजारपेठ वधारणार
हिंदुस्थान ही सौंदर्य आणि वैयक्तिक आरोग्यनिगा क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी चौथ्या क्रमांकाची बाजारपेठ असून येत्या पाच वर्षांत ती 10 ते 11 टक्के वधारेल असे नायका ब्युटी ट्रेंड्स रिपोर्टमधून निदर्शनास आले आहे. ‘रेडसीर’च्या सहकार्याने तयार केलेल्या अहवालात नऊ प्रमुख ट्रेंड्सवर प्रकाश टाकला आहे. पुढील पाच वर्षांत ही बाजारपेठ वार्षिक 10 ते 11 टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे, असे ‘रेडसीर स्ट्रटेजी कन्सल्टंट्स’चे सीईओ अनिल कुमार यांनी सांगितले.
पोर्शे अपघात प्रकरणाशी टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांनी दिली माहिती
पोर्शे अपघात प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी करण्यात आली. याप्रकरणाशी आमदार टिंगरे यांचा संबंध असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त कुमार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या घटनेचा तपास पुणे पोलीस योग्य पद्धतीने करत आहेत. सोशल मीडियावर पोलिसांवर टीका झाली. मात्र पोलिसांनी तपासात कोणताही हलगर्जीपणा केलेला नाही. सर्व शक्यात गृहित धरुनच पोलिसांनी तपास केला आहे.
आपटेच्या घर, कारखान्याची झाडाझडती
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला शिल्पकार जयदीप आपटे याची एकीकडे पोलीस कोठडीत चौकशी सुरु असतानाच सिंधुदुर्ग पोलीस आज कल्याणला आपटे यांच्या घरी पोहोचले आहे. आपटे याच्या घरी कुटुंबीयांची तब्बल तीन तास चौकशी केल्यानंतर पोलीस त्याच्या कारखान्यात दाखल झाले. पुतळा तयार करण्यासाठी कोणते साहित्य वापरले याचा तपास पोलीस करत आहेत. या तपास कामात पथकाला आपटे यांची पत्नी, आई आणि शेजाऱ्यांनी सहकार्य केले. आपटे यांनी छत्रपती महाराजांचा पुतळा त्याच्या घराजवळच्या शिल्पालयात तयार केला असल्याने पोलिसांनी त्याचे शिल्पालय गाठले.