देशातील महत्वाच्या घडामोडी

लोकसंख्येत हिंदुस्थान चीनला भारीच…, पुढील वर्षी 146 कोटी

2025 मध्ये हिंदुस्थानच्या लोकसंख्या वाढीचा दर 0.9 टक्के असेल. त्यानुसार पुढील वर्षीपर्यंत देशाची लोकसंख्या तब्बल 146 कोटींवर जाण्याची शक्यता असून हिंदुस्थानची लोकसंख्या वाढता वाढता वाढे अशी स्थिती आहे. लोकसंख्येत हिंदुस्थान चीनला आणखी मागे टाकेल, असा अंदाज ‘यूएनडीईएसए’ अर्थात ‘युनायटेड नेशन्स सोशल इकॉनॉमिक एजन्सी’ने व्यक्त केला आहे. ‘यूएनडीईएसए’ने एप्रिल 2023 मध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या 142 कोटी किंवा त्याहून अधिक म्हणजेच चीनची बरोबरी करेल असा अंदाज व्यक्त केला होता. तो खरा ठरला होता. दरम्यान, पुढील वर्षी 2025 पासून राष्ट्रीय जनगणना सुरू होणार असून 2026 च्या सुरुवातीच्या महिन्यांत ही जनगणना पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नेमके आकडे समोर येतील.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन

अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे रविवारी निधन झाले. दीड महिन्यापूर्वी कुर्ला येथे अपघातात समीर खान गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. अपघातात मेंदूला जबर मार लागला होता. त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. नवाब मलिक यांनी गुरुवारी ‘एक्स’ अकाऊंटवर समीर खान यांच्या निधनाची माहिती पोस्ट केली. समीर खान हे नवाब मलिक यांची मोठी मुलगी निलोफर हिचे पती होते. 17 सप्टेंबरला सकाळी समीर खान तपासणीसाठी क्रिटीकेअर रुग्णालयात गेले होते. तपासणी झाल्यानंतर घरी जाण्यासाठी ते कारची वाट बघत होते. यादरम्यान त्यांच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि थार कार समीर यांच्या अंगावर गेली. या अपघातात समीर गंभीर जखमी झाले होते.

सुलोचना सावंत यांचे निधन

सुलोचना सावंत यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात रमेश, जगदीश, सुनील ही तीन मुले व मुलगी प्रमिला असा परिवार आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य रमेश सावंत यांच्या त्या आई होत. सुलोचना सावंत यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी भोईवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ, विधानसभा संघटक सुधीर साळवी, गजानन चव्हाण, भारत म्हाडगुत, अनिल कोकीळ, गोपाळ खाडये व मिनार नाटळकर उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजीओग्राफी आणि अँजीओप्लास्टी झाल्यानंतर रविवारी त्यांना पुण्यातील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने ही माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजीओप्लास्टीनंतरची काळजी घेण्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी त्यांना एका वेलनेस सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हापूसची पहिली पेटी नाशिकच्या बाजारात!

मालवण कुंभारमाठ येथील प्रतिथयश आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर आणि त्यांचे बंधू सूर्यकांत फोंडेकर यांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त साधत या वर्षीच्या हंगामातील हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिक येथे थेट ग्राहकांपर्यंत पाठविण्याचा मान पटकावला. सिंधुदुर्ग जिह्यात पडणारा मुसळधार पाऊस, वादळी वारे यांच्यापासून आंबा बागायतीचे संरक्षण करीत फळ पिकविण्यात फोंडेकर बंधूंना यश आले.

फॅन्सचा मोबाईल चोरणारा अटकेत

अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या फॅन्सचा मोबाईल चोरणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. समीर रशीद खान असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. किंग खानचा शनिवारी वाढदिवस होता. शुक्रवारी रात्रीदेखील फॅन्स हे किंग खानला शुभेच्छा देण्यासाठी ‘मन्नत’बाहेर जमले होते.

शिवसेना राज्य संघटकपदी विनायक पांडे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना राज्य संघटकपदी विनायक पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

स्वामिनारायण मंदिरात अन्नकूट उत्सव जल्लोषात

दिवाळीचा नवीन विक्रम संवत 2081 च्या पाडवा- बलिप्रतिपदेला दहिसर पूर्व येथील आनंद नगर, बाभळी पाडाजवळील जागा स्वामी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण मंदिरात (जाप्स) परिवाराचे हरिभक्त व महिला मंडळाच्या वतीने गोवर्धन पूजा-अन्नकूट उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. भगवान श्रीजी महाराजांना सुंदर वस्त्राचा शृंगार करून अकराशे प्रकारच्या व्यंजनाचा फराळ अर्पण करण्यात आला. यावेळी मंदिराचे संस्थापक पू. सच्चिदानंद स्वामी यांचे पट्टशिष्य श्री योगीजी यांनी वचनामृतचे सुरेल निरूपण करत जाप्स मंदिरच्या कॅलेंडरचे अनावरण करून सेवा देणाऱ्या सर्व हरिभक्तांना नवीन वर्षाचे आशीर्वाद दिले. बाळ मंडळी व तरुण हरिभक्त मंडळाने कीर्तन गायन केले.

बंद खोलीत थर्ड डीग्री दिल्याचा माजी सैनिकाचा आरोप

एका वादातून मुलांची डोकी फुटल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेलेल्या माजी सैनिकाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य न करता उलट त्यालाच बंद खोलीत डांबून एखाद्या आरोपीप्रमाणे थर्ड डीग्री दिल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे उघडकीस आला आहे. एका दहशतवाद्याला जशी वागणूक दिली जाते त्या पद्धतीने मला मारण्यात आल्याचा आरोप माजी सैनिकाने केला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात पोलिसांचे जंगलराज सुरू आहे का? देश असाच चालवणार का? असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारला जात आहे. इंद्रल सिंह असे या माजी सैनिकाचे नाव असून त्यांनीच त्यांच्यासोबत घडलेला प्रकार कथन केला आहे. त्यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.