सरकार द्वेष पसरवतेय
आपण ज्या युगात आहोत त्या काळात केंद्रात भाजपचे सरकार आहे. हे सरकार नियोजनबद्धरीत्या समाजात द्वेष आणि राग पसरवते. अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले आपण पाहिले आहेत. मणिपूरमध्ये काय झाले ते सर्वांनी पाहिले आहे, अशा शब्दांत वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका गांधी यांनी वायनाडमधील सभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. माझा भाऊ राहुल गांधी यांच्यासारखे होणे सोपे नाही. त्यांना 10 वर्षे भाजपकडून क्रूर हल्ल्यांचा सामना करावा लागला. त्यांच्याबद्दल खोटे पसरवले गेले. जागतिक राजकारणात हे घडणे खूप वेगळे आहे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली प्रामाणिकतेची प्रतिज्ञा
केंद्रीय दक्षता आयोगाने 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान दक्षता जागरूकता सप्ताह पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार राज्य बँकेने सोमवारी मुख्य कार्यालयात दक्षता जागरूकता सप्ताह साजरा केला. या वेळी सर्व कर्मचाऱ्यांना कामात पारदर्शकता, निष्पक्षता यांची शपथ देण्यात आली. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. बँकेच्या ग्राहकाला साक्षर न करणे हादेखील भ्रष्टाचार आहे. तसेच बँकेच्या ग्राहकास त्यांच्या फायद्यासंदर्भातील नियम समजावून न सांगणे हादेखील भ्रष्टाचार ठरतो, असे विद्याधर अनास्कर म्हणाले. राज्य बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक माने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. बँकेच्या सरव्यवस्थापिका डॉ. तेजल कोरडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यूपीत विद्यार्थ्यांना फक्त 300 रुपयांची शिष्यवृत्ती
उत्तर प्रदेशातील 69 हजार 195 संस्कृत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते संस्कृत शिष्यवृत्ती योजनेचे धनादेश काही विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. मात्र, हे धनादेश केवळ 300 रुपयांचे होते. त्यामुळे यावरून आदित्यनाथ यांच्यावर आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. हे केवळ भाजपाच करू शकते. यामधून असे दिसते की, 300 रुपयांचे चेक वितरित करण्यात आलेल्या चेकला छापण्यासाठी अधिक खर्च आला असेल, अशी खोचक टीका उत्तर प्रदेश सरकारवर सोशल मीडियावर होत आहे.
मुंबई विभाग क्र.6 च्या महिला विभाग संघटकपदी संजना मुणगेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 6 च्या महिला विभाग संघटकपदी संजना मुणगेकर (विधानसभा-कुर्ला, कलिना, चांदिवली) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा संघटकपदी श्रेया परब
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिह्याकरिता महिला जिल्हा संघटकपदी श्रेया परब (विधानसभा-मालवण-कुडाळ व सावंतवाडी) यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
शेख हसीना अडचणीत
बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात दाखल झालेल्या खून खटल्याप्रकरणी ढाका येथील न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने पोलिसांना 28 नोव्हेंबरपर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेख हसीना यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. हे प्रकरण मीरपूरमधील 18 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान झालेल्या मृत्यूशी संबंधित आहे. या प्रकरणात हसीना आणि इतर 23 जणांना आरोपी करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.
कामगार आयुक्तालयात जनजागृती कार्यक्रम
दक्षता सप्ताहच्या माध्यमातून राज्य कामगार आयुक्त कार्यालयात जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तुपे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या काळात दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. भ्रष्टाचाराशी लढा देण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या धोक्याबाबत सामान्य नागरिकांना जागरूक करणे महत्त्वाचे आहे. दक्षता सप्ताच्या माध्यमातून कामगार आयुक्त कार्यालयात नुकताच कार्यक्रम आयोजित केला होता. एसीबीचे निवृत्त सहाय्यक आयुक्त विलास तुपे यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. एसीबीचे सापळे कसे लावतात याबाबत मार्गदर्शन केले.
‘जिओभारत’ 4 जी फोन फक्त 699 रुपयांत
रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी भेट दिली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कंपनीने जिओभारत 4 जी फोनच्या किमतीत 30 टक्के कपात केली आहे. मर्यादित कालावधीच्या या ऑफरमध्ये 999 रुपयांचा जिओभारत मोबाइल फोन आता 699 रुपयांच्या विशेष किमतीत उपलब्ध आहे. जिओभारत फोनला 123 रुपयांमध्ये रिचार्ज करता येईल. या मासिक टॅरिफ प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉल्स, 14 जीबी डेटादेखील ग्राहकांना मिळेल.
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांना शिवसेनेची उमेदवारी
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना विभागीय नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. माघारीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तनवाणी यांना पक्षातून पदमुक्त करण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले.