देशभरातील महत्वाच्या घडामोडी

काही शिल्लकच राहत नाही, हीच कष्टकऱ्याची कहाणी; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका सलूनला भेट दिली. या वेळी अजित नावाच्या नाभिकाने तो दिवसभर कसा काम करतो जेणेकरून दिवसाच्या शेवटी काही पैसे वाचवता येतील, अशी आपली संघर्षमय कहाणी त्यांना सांगितली. हा व्हिडीओ शेअर करून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले, शेवटी काहीच शिल्लक राहत नाही ही देशातील प्रत्येक कष्टकरी गरीबाची कहाणी आहे. व्हिडीओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये राहुल गांधी यांनी लिहिलेय, ‘नाभिक ते मोची, कुंभार ते सुतार… घटते उत्पन्न आणि वाढत्या महागाईने कामगारांच्या आकांक्षा, त्यांची दुकाने, घरे आणि स्वाभिमान हिरावून घेतला. आज अशा आधुनिक उपायांची गरज आहे ज्यामुळे उत्पन्न वाढेल आणि घरांमध्ये बचत परत येईल.

जोगेश्वरीत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या स्वयंसेवकांचे श्रमदान

जोगेश्वरी पूर्वेकडील एमएचबी कॉलनी-सर्वोदयनगरमध्ये शनिवारी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी श्रमदान केले. संस्थेच्या धारावी ग्रुपमधील तरुण-तरुणींनी स्वयंस्फूर्तीने एमएचबी कॉलनीतील उद्यानाची स्वच्छता केली. जीवनात सेवाभावी दृष्टिकोन ठेवला पाहिजे, निस्वार्थी भावनेने समाजाची सेवा केली पाहिजे हा श्री श्री रविशंकर यांनी दिलेला संदेश अंगीकारत आम्ही उपक्रमात सहभागी झालो, अशी भावना सहभागी तरुण-तरुणींनी व्यक्त केली. कॉलनीतील रहिवाशांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.

गोरेगावात रंगणार नक्षत्रांचे देणे

प्रबोधन गोरेगावच्या वतीने ‘नक्षत्रांचे देणे’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजता प्रबोधन क्रीडा भवन, गोरेगाव पश्चिम येथे रंगणार आहे. याअंतर्गत आयोजित प्रकाशोत्सव लखलखत्या स्वरांचा दीपोत्सव या मैफलीत शौनक अभिषेकी, अंजली मराठे, मंगेश बोरगावकर, शरयू दाते हे गायक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन हृषीकेश जोशी, मधुरा वेलणकर करणार आहेत. त्यामुळे रसिकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

गोवंडीत नाल्यात आढळला दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह

गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील एका नाल्यात शिवाजी नगर पोलिसांना शनिवारी सकाळी दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडला. शुक्रवारी रात्री ती मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरातील प्लॉट नंबर पाच येथे ही मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत राहत होती. शुक्रवारी सायंकाळी ती मुलगी परिसरातील लहान मुलांसोबत खेळत होती. त्यानंतर ती मुलगी अचानक गायब झाली. बराच वेळ शोधू घेऊनही मुलगी तिच्या कुटुंबीयांना सापडली नाही. त्यामुळे त्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. पोलिसांकडून या मुलीचा शोध सुरू असतानाच शनिवारी सकाळी प्लॉट नंबर पाच येथील नाल्यात तिचा मृतदेह मिळून आला.

तासगावमध्ये आबा-काका गटांत ‘टशन’

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी विधानसभेसाठी आमनेसामने आले आहेत. भाजपचे प्रमुख नेते असलेल्या संजय पाटील यांनी ऐन निवडणुकीत हातात घड्याळ बांधून अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला. आबा आणि काका गटातील संघर्ष 1990 पासून सुरू आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील विरुद्ध संजय पाटील हा संघर्ष आधी पाहायला मिळाला होता. आता आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीनंतर पुन्हा एकदा हा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. आर. आर. पाटील विरुद्ध संजय पाटील अशीच ही लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक ठरणार आहे.

घाटगे-हसन मुश्रीफ गटात तुफान राडा

कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे गट आणि हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी रात्री मोठा राडा झाला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करत दगडफेक केली. कागल मतदारसंघात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समरजीतसिंह घाटगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. परंतु एका कार्यक्रमात अचानक दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्की करण्यात आली. कागल पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत केले. कागलमध्ये मारामारीचे प्रकार होणार असतील तर येथून पुढे कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी सांगितले.

नवाब मलिक मानखुर्दमधून लढण्यावर ठाम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला आहे. पण नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्दमधून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. माजी मंत्री नवाब मलिक यांना महायुतीमधून उमेदवारी देण्यास भाजपने कडाडून विरोध केला आहे. नवाब मलिक यांना तिकीट द्यावे की नाही याचा निर्णय त्यांच्या पक्षातील नेते घेतील; पण दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजपचे कार्यकर्ते करणार नाहीत अशी आमची ठाम भूमिका असल्याचे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले. पण आपण शिवाजी नगर मानखुर्दमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहोत. कशी निवडणूक लढवणार हे तुम्हाला 29 ऑक्टोबरला समजेल असे नवाब मलिक म्हणाले. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत प्रफुल्ल पटेल यांनी आज नवाब मलिक यांची भेट घेऊन चर्चा केली.

मुश्रीफांनी बुद्ध विहारात 50टक्के मार्जिन घेतले

पालकमंत्री पद मिळावे यासाठी हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्या विचारांना तिलांजली दिली. बुद्ध विहारांच्या कामांमध्ये 50 टक्के मार्जिन घेतल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. मुरगूड येथे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. हसन मुश्रीफ म्हणतात की, मी विकासकामांसाठी गेलो. तुमची विकास कामे म्हणजे 1500 कोटींची आणि मलिदा 700 कोटींचा आहे. रस्त्यांच्या कामात तुम्ही कमिशन खाल्ले. वाडी-वस्तीवरील रस्ते कागदोपत्री दाखवले. हे सर्व कारनामे जनतेला समजले आहेत. त्यामुळे मुश्रीफ घाबरले आहेत, असे रोहित पवार म्हणाले.