देशभरातील महत्वाच्या घडामोडी

‘स्त्री 2’ पोहोचला सहाशे कोटी क्लबमध्ये!

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री 2’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे. जवान, ऑनिमल, गदर 2, पठाण, बाहुबली 2 या चित्रपटांना पछाडत सहाशे कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा स्त्री 2 हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, केवळ हिंदी या एकाच भाषेत रिलीज होऊन देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. बॉलीवूडच्या चित्रपटाचे यश हे त्याने बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपये कमावले यावरून ठरते. 2008 साली आमिर खानच्या गजनी या चित्रपटाने सर्वाधिक शंभर कोटी रुपयांची कमाई करत बॉलीवूडमध्ये शंभर कोटी क्लबचा ट्रेंड आणला. 2017 साली अनुक्रमे 400 आणि 500 कोटी क्लबमध्ये पहिला पोहोचणारा प्रभासचा बाहुबली 2 हा चित्रपट होता. आता सहाशे कोटी क्लबमध्ये स्थान मिळवणारा श्रद्धा कपूरचा स्त्री 2 हा पहिला चित्रपट ठरलाय.

2 लाख देऊन बनला आयपीएस

बिहारमध्ये एका 18 वर्षीय तरुणाने आयपीएस असल्याचा बनाव केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सर्व प्रकार समजून घेतला तेव्हा त्यांनाही धक्का बसला. या तरुणाने आयपीएस होण्यासाठी तब्बल दोन लाख रुपये मोजले होते. त्यानंतर त्याला गणवेश आणि पिस्तूल मिळाली. तरुण गणवेश चढवून, कमरेला पिस्तूल सालून आईचा आशीर्वाद घेत घरातून बाहेर पडला. आता आपण लवकरच कर्तव्यावर रुजू होणार, असे स्वप्न पाहत असताना वाटेतच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

वाघाच्या दहशतीमुळे शाळा बंद

उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिह्यातील जखनीधर तहसीलमधील शाळा वाघाच्या भीतीमुळे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. द्वारीखलमधील नऊ शाळा 23 आणि 24 सप्टेंबर रोजी बंद ठेवण्याची घोषणा पौडीचे जिल्हा दंडाधिकारी आशिष चौहान यांनी केली आहे. शनिवारी सकाळी 7 वाजता द्वारीखल परिसरातील थांगर गावात एक विद्यार्थी वाघाच्या हल्ल्यात जखमी झाला होता. त्यानंतर ठाणगर येथील शासकीय प्राथमिक शाळेजवळही मोठा वाघ दिसला होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने द्वारीखाल परिसरातील नऊ शाळा आणि सर्व अंगणवाडी केंद्रांना सोमवार, मंगळवार सुट्टी असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

बंदूक तस्करांना अटक

जालंधर परिसरात बंदुकांची तस्करी करणारी एक आंतरराज्यीय टोळी पोलिसांनी पकडली असून 17 जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून 18 शस्त्र, 66 काडतुसे आणि 1.10 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईची माहिती एक्स वर पोलिसांनी दिली आहे. ही टोळी पंजाबमधील अनेक जिह्यांमध्ये अनेक गुह्यांमध्ये सहभागी होती. पंजाब आणि हरियाणामधील टोळ्यांना हे बंदुक तस्कर शस्त्रास्त्र पुरवत होते, असे पंजाब पोलिस महासंचालकांनी म्हटले आहे.

अजितदादांचा जावलीतील मोहरा पवारांच्या भेटीला

शरद पवार यांच्याशी द्रोह करून भाजपच्या कच्छपी लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्क्यामागून धक्के बसत असताना, आज साताऱ्यात आणखी एक धक्का बसला. पक्षफुटीनंतर अजित पवारांच्या गटात सामील झालेल्या अमित कदम यांनी आज शरद पवार यांची भेट घेऊन सातारा-जावलीतून तुतारीच्या चिन्हावर लढण्याची इच्छा व्यक्त केली. पक्षफुटीनंतर आमदार मकरंद पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याप्रमाणे अमित कदम यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले काहीजण अजित पवारांच्या गटात गेले. मात्र, पवारांची साथ सोडल्याने अजित पवार यांना सातत्याने झटके बसत आहेत.