देशभरातील महत्वाच्या घडामोडी

मेगाब्लॉकने लोकलचे वेळापत्रक कोलमडले; चाकरमान्यांचे हाल

मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवर रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले आणि चाकरमान्यांचे हाल झाले. रविवारी सुट्टीच्या दिवशी लग्नाचा मुहूर्त होता. त्यामुळे अनेक ठिकाणी लग्न समारंभांची धामधूम होती. या लग्नांचा मुहूर्त गाठण्यासाठी घाईघाईने घरातून बाहेर पडलेले कुटुंबीय मध्य रेल्वेच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवासातच अडकले. मध्य रेल्वे प्रशासनाने लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द केल्या होता. त्याचबरोबर ज्या फेऱ्या सुरू होत्या त्याही 20 ते 30 मिनिटांच्या विलंबाने धावत होत्या. हे कोलमडलेले वेळापत्रक सायंकाळी उशिरा पूर्वपदावर आले.

पाणथळ जागा संरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

2.25 हेक्टर्सहून कमी क्षेत्र असलेल्या सर्व पाणथळ जागा 2017 मधील पाणथळ (संरक्षण आणि व्यवस्थापन) नियमावलीच्या तरतुदींतर्गत अधिसूचित कराव्यात आणि या जागांचे संरक्षण करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते मनू भटनागर आणि विक्रांत टोंगड यांनी ही याचिका केली आहे. देशातील जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे देशभरातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न नजीकच्या भविष्यात निर्माण होऊ शकतो. त्याच अनुषंगाने पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.

पं. संजीव अभ्यंकर यांचे सुरेल गायन, बासरी–व्हायोलिन जुगलबंदीही अविस्मरणीय

70व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या अखेरच्या दिवशीच्या पहिल्या सत्रावर लोकप्रिय गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या सुरेल गायनाची स्वरमुद्रा उमटली. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य शैलीतील व्हायोलिन आणि बासरीवादनाच्या जुगलबंदीलाही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल येथे 70वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू आहे. राग अहिरभैरवमध्ये विलंबित एकतालात ‘रसिया म्हारा’ हा ख्याल त्यांनी प्रथम सादर केला. ‘सावनकी झरने लगे है…’ ही द्रूत त्रितालातील रचना दाद मिळवणारी ठरली. तिन्ही सप्तकांत लीलया संचार करणारा सुरेल आवाज, आकर्षक ताना, स्वरसंवाद साधत खुलत जाणारी कामगत, ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये जाणवली. चढत्या मध्यान्हीला अनुसरून त्यांनी राग ‘शुद्ध सारंग’मध्ये ‘सावरे सो प्रीत लगायी…’ ही त्रितालातील रचना सादर केली.

म्हाडा लोकशाही दिन

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) आठव्या ‘लोकशाही दिनाचे’ आयोजन 13 जानेवारीला म्हाडा मुख्यालयात दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/अडचणी ऐकून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन शासन स्तरावर राबवण्यात येत असतो. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर जानेवारी-2024 पासून ‘म्हाडा’मध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे.

हेलिकॉप्टर रुग्णालयाला धडकून 4 मृत्युमुखी

तुर्कीच्या मगला प्रांतात हेलिकॉप्टर रुग्णालयाला धडकून दोन वैमानिक आणि एका डॉक्टरसह चार जणांचा मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर जवळच्या रुग्णालयाच्या चौथ्या मजल्याला धडकले. याबाबतची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. छायाचित्रांमध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष आणि रुग्णालयाचे झालेले नुकसान दिसून येत आहे. दरम्यान, यापुर्वी 9 डिसेंबरला तुर्कस्तानमधील इस्पार्टा प्रांतात दोन लष्करी हेलिकॉप्टरच्या झालेल्या धडकेत 6 लष्करी जवान शहीद झाले होते.

बालविवाहप्रकरणी 431 जणांना अटक

बालविवाहविरोधी विशेष मोहिमेदरम्यान आसाम पोलिसांनी तब्बल 431 जणांना अटक केली. तब्बल 345 तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. स्वतः आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवरून याबाबत आज सकाळी माहिती दिली. 3 टप्प्यांत ही मोहीम राबवण्यात आली. 21 आणि 22 डिसेंबर अशा दोन दिवसांत 335 तक्रारींच्या अनुषंगाने तब्बल 416 जणांना अटक करण्यात आली.

श्री मुनी निलेश चंद्र आणि हार्दिक हुंडिया यांचा सन्मान

गोरक्षक, राष्ट्रीय संत श्री मुनी निलेश चंद्र आणि स्टार रिपोर्टचे संपादक, उद्योजक हार्दिक हुंडिया यांचा 36 कोम कमिटीच्या वतीने एका भव्य सोहळ्यात हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. यावेळी संपूर्ण वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. श्री मुनी निलेश चंद्र आणि हार्दिक हुंडिया यांच्या प्रयत्नाने अंधेरी येथील जैन मंदिर भाविकांसाठी खुले करून देण्यात आले. या मंदिराच्या ट्रस्टींनी हे मंदिर 50 वर्षांपूर्वी आपल्या आजोबांनी उभारल्याचे सांगत मंदिराला टाळे लावले होते. हार्दिक हुंडिया यांनी सातत्याने पोलीस प्रशासन यांच्याशी सातत्याने समन्वय साधला. श्री मुनी निलेश चंद्र यांचा आदेश मानून विश्वस्तांनी हे मंदिर खुले करून दिले. सध्याच्या काळात श्री मुनी निलेश चंद्र आणि हार्दिक हुंडिया यांच्यासारख्या धर्मप्रेमींची गरज असल्याची भावना 36 कोम कमिटीच्या वतीने व्यक्त करण्यात आली.