देशभरातील महत्वाच्या घडामोडी

एका वर्षात नक्षलवाद संपवू – अमित शहा

31 मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडला नक्षलवाद्यांपासून पूर्णपणे मुक्त करू, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. छत्तीसगड नक्षलमुक्त होताच देशभरातून नक्षलवाद संपेल, असेही त्यांनी म्हटले आहे. रायपूर येथील प्रेसिडेंट पोलीस कलर अवॉर्ड कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी रायपूर येथील पोलीस परेड ग्राऊंडवर प्रेसिडेंट पोलीस कलर अवॉर्ड-2024 कार्यक्रमात पोलीस प्लॅटूनची सलामी घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती पालीस कलर फ्लॅग पोलिसांना सुपूर्द केला. दरम्यान, कार्यक्रमानंतर त्यानी छत्तीगड, ओदिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांमधील 30 आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची शहा यांनी भेटली.

कश्मीरमध्ये थंडीची लाट; पारा उणे 3.4 डिग्री सेल्सियसवर

प्रचंड बर्फवृष्टीमुळे कश्मीर अक्षरशः गोठले असून थंडीची लाट आल्याचे चित्र आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे 3.4 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले, तर रात्रीच्या सुमारास पारा उणे 4.6 डिग्री सेल्सियसपर्यंत उतरत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गुलमर्गमध्ये पारा 3.8 सेल्सियस इतका नोंदवला गेला.

उत्तर प्रदेशात थंडीचा विक्रम

उत्तर हिंदुस्थानातील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी कायम असून डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तर प्रदेशात 20 वर्षांनंतर थंडीची लाट आली आहे. साधारणपणे तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यातही थंडीची लाट कायम असणार आहे. चित्रकूट येथील शेतकऱ्याचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाला. अयोध्येत सर्वाधिक थंडी जाणवत आहे.

अस्वलांना पाहून वाघ पळाला

मध्य प्रदेशातील नर्मदापुरमच्या सातपुडा व्याघ्र प्रकल्पात एक थरारक दृश्य पाहायला मिळाले. अस्वलांच्या भीतीने एका वाघाने मार्ग बदलला. अस्वलाचे कुटुंब त्याच्याकडे सरकले तेव्हा तो माघारी फिरत पळून गेला. शनिवारच्या सफारीदरम्यान काही पर्यटकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले.

जिम कॅरी पुन्हा घालणार मास्क

जिम कॅरी या अभिनेत्याचा ‘द मास्क’ हा 1994 मध्ये आलेला विनोदी सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमातील पात्र पुन्हा साकारण्यास तयार असल्याचे जिम कॅरीने म्हटले आहे. परंतु या वेळी कल्पना आणखी हटके आणि चांगली हवी अशी अट त्याने ठेवली आहे. चक रसेलने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात जिम कॅरी एक क्लर्क दाखवला आहे. त्याला एक मास्क सापडते. ते घातल्यानंतर तो सुपरहीरो बनतो.

ताडोबातील वाघांना रेडिओ कॉलर

प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांचा अभ्यास करण्यासाठी चार नर वाघांना वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ताडोबा प्रशासनाच्या मदतीने रेडिओ कॉलर लावण्यात आले. त्यांचे वय अंदाजे दीड ते अडीच वर्षे एवढे आहे. या तरुण वाघांच्या हालचाली समजून घेण्यास या रेडिओ कॉलरची मदत होईल, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

बनावट पासपोर्ट; बंगालमध्ये दोघांना अटक

बांगलादेशातील नागरिकांना बनावट हिंदुस्थानी पासपोर्ट बनवून दिल्याच्या आरोपाखाली पश्चिम बंगालमधील दोघांना पोलिसांनी अटक केली. समरेश बिस्वास आणि दीपक मोंडल अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून तब्बल 34 बनावट पासपोर्ट आणि बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. प्रत्येक बनावट पासपोर्टसाठी ते दोन लाख रुपये घेत होते. दोघांना न्यायालयात हजर केले असता 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणणार- अतिशी

आम आदमी पार्टीचे सरकार नेहमीच डॉक्टरांच्या बाजूने उभे राहिले असून डॉक्टरांविरोधातील हिंसाचाराला तसेच हल्ल्यांना आळा घालण्यासाठी दिल्ली सरकार कायदा करण्यासाठी तयार असल्याचे मुख्यमंत्री अतिशी यांनी म्हटले आहे. दिल्ली राज्य वैद्यकीय संघटनेच्या वार्षिक परिषदेत प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

श्रीलंकन राष्ट्रपती हिंदुस्थान दौऱ्यावर

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायका हे तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी हिंदुस्थानात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिसनायका हे दोन्ही नेते 16 डिसेंबर रोजी दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि समुद्री सुरक्षा अशा विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. दिसनायका दिल्ली विमानतळावर पोहोचल्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी त्यांचे स्वागत केले.

‘आप’ची यादी जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची चौथी आणि शेवटची यादी आज जाहीर केली. यात एकूण 38 नावे आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीतून निवडणूक लढवणार आहेत. तर मुख्यमंत्री अतिशी या कालकाजी येथून निवडणूक रिंगणात असतील. सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाश, सत्येंद्र जैन शकूर बस्ती येथून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, यावेळी ‘आप’ने एकूण 26 आमदारांची तिकिटे कापली असून चौघांचे मतदारसंघ बदलले आहेत.

तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणारा ताब्यात

तरुणीला पाहून अश्लील कृत्य करणाऱ्याला गावदेवी पोलिसांनी अटक केली. दीनदयाल मोतीराम सिंग असे त्याचे नाव आहे. सिंग हा फरसाण विक्रीचे काम करतो. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार ही तरुणी आहे. गेल्या महिन्यात ती कंबाला हिल बस स्टॉप ते ग्रॅण्ट रोड असा टॅक्सीने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान सिंगने तिचा पाठलाग केला. पाठलाग करून अश्लील कृत्य केले. त्या कृत्यामुळे तरुणी ही घाबरली. गेल्या आठवड्यात तरुणीच्या एका मित्राने सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडीओ अपलोड केला होता. त्या व्हिडीओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली.

कधीकाळी हॉटेलमध्ये नोकरी करणारे सक्सेना आता ‘लेफ्टनंट’

वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेत लष्करात भरती झालेले रमण सक्सेना लेफ्टनंट झाले आहेत. इंडियन मिलिटरी अकॅडमीत कार्यरत असणाऱ्या रमण सक्सेना यांनी सैन्यात अधिकारी बनण्यात यश मिळवले. त्यांनी एकेकाळी हॉटेलमध्ये नोकरी केली. तसेच 2015 ते 2017 अशी दोन वर्षे इंडियन मिलिटरी अकॅडमीत सेवा दिली. उत्तर प्रदेशातील आग्रा जिह्यातील फतेहबाद येथील सक्सेना यांनी आता स्पेशल कमिशन्ड ऑफिसर (एससीओ) बनून स्वप्न पूर्ण केले. रमेश यांचे वडील बाबू सक्सेना यांनीदेखील लष्करात सेवा दिली. वडिलांच्या कार्याने प्रेरित होऊन हिंदुस्थानच्या सैन्यात जायचा असा निर्धार होता. मात्र सुरुवातीला वाटेत अनेक काटे आले. अशातच करिअरने लष्करापासून दूर नेले.