देशभरातील महत्वाच्या घडामोडी

cold-wave

राजस्थान काश्मीरमध्ये, हुडहुडी

जम्मू-कश्मीरच्या किमान तापमानात घसरण झाल्याने पुढील चार दिवसांत अनेक भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मैदानी भागात झालेल्या हिमवृष्टीनंतर खोऱ्यातील तापमान घसरले. त्यामुळे हुडहुडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे, राजस्थानमध्ये गेल्या 24 तासांत राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट दिसून आली. उत्तर राजस्थान आणि शेखावती प्रदेशात तापमानाचा पारा घसरल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली.

बिहारमध्येही ‘लाडकी बहीण’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजना गेमचेंजर ठरली. त्याच धर्तीवर दिल्लीत आम आदमी पक्षाने महिलांना दरमहा 1 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. आता बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सत्तेत आल्यास महिलांना दरमहा 2,500 रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूका आहेत.

तामीळनाडूत पूरसदृश स्थिती

ऐन थंडीत पावसाच्या आगमनामुळे तामीळनाडूतील विविध भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. संततधार पावसामुळे थमीराबरानी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे तुतीकोरीन जिह्यातील श्रीवैपुंटम आणि इरल भागात पुराचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गांजा विकणाऱ्या डोंगरीत दोघांना अटक

ड्रग्ज पेडलर्सना गांजा विकणाऱ्या दोघांना लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी डोंगरीच्या टणटणपुरा येथे पकडले. पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांचा शोध घेत होते; परंतु दोघेही पोलिसांना गुंगारा देत लपून राहत होते. पोलिसांनी 8 तारखेला अशिकुर रहमान याला 144 ग्रॅम वजनाच्या गांजासह रंगेहाथ पकडले होते. त्याच्या चौकशीत त्याने हा गांजा डोंगरीच्या खडक परिसरातून खरेदी केल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेहान अन्सारी याला पकडले. त्याच्याकडे 55 ग्रॅम गांजा सापडला. अशिकुर व रेहान या दोघांकडे सापडलेला गांजा हा दानिश मर्चंट व कादिर यांच्याकडून खरेदी केल्याचे समोर आले. शुक्रवारी दानिश आणि रेहान हे दोघे डोंगरीच्या टणटणपुरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही पकडले.