महाकुंभसाठी मोदींच्या हस्ते कलश स्थापना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज महाकुंभसाठी कलशाची स्थापना केली. 5 हजार 700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटनही करण्यात आले. गुलामगिरीच्या काळातही कुंभावरील श्रद्धा थांबली नाही, असे मोदी उद्घाटनानंतरच्या भाषणात म्हणाले. संगमावर आल्यानंतर संत, ऋषी, विद्वान सर्वच एक होतात. जातिभेद नाहीसे होतात. पंथांमधील संघर्ष नाहीसा होतो. प्रयागराज ते ठिकाण आहे, ज्याच्या प्रभावाशिवाय पुराण पूर्ण झाले नसते. म्हणूनच महाकुंभ म्हणजे एकतेचा महान यज्ञ आहे असे मला वाटते, असे मोदी म्हणाले.
चंद्रपूर जिह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी संदीप गिऱ्हे (विधानसभा – बल्लारपूर, राजूरा), मुकेश जीवतोडे (विधानसभा – चंद्रपूर, वरोरा), रवींद्र शिंदे (विधानसभा – चिमूर, ब्रम्हपुरी) यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
राज कपूर, दिलीप कुमार यांच्या घरांसाठी जागतिक बँकेची मदत
बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेते राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील पेशावर येथील वडिलोपार्जित घराचे जतन करण्यासाठी जागतिक बँकेने 200 दशलक्ष रुपये म्हणजेच 20 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. चार महिन्यात या घरांची डागडुजी सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अंतर्गत कामही करण्यात येणार आहे, अशी माहिती खैबर पख्तुन्ख्वाच्या पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. अब्दुस समद यांनी दिली.
तामिळनाडूतील रुग्णालयाला आग; सहा जणांचा मृत्यू
तामिळनाडूतील डिंडीगुल येथील एका खासगी रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्व मृत रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले होते. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली.
कोलकाता बलात्कार ः घोषला जामीन
बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना आज जामीन मिळाला; परंतु ते अद्याप तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत. पुराव्याशी छेडछाड केल्याप्रकरणी घोष यांना जामीन मिळाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिक फसवणूकप्रकरणी मात्र घोष तुरुंगातच राहणार आहेत.
शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी जामीन
पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात माजी राज्यमंत्री पार्थ चटर्जी यांचा जामीन सर्वोच्च न्यालायाने आज मंजूर केला. परंतु, यावेळी काही अटीही घालण्यात आल्या. हिवाळी सुट्टीत किंवा 31 डिसेंबर 2024 पर्यंत यापैकी जे आधी असेल त्यावर निर्णय घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ट्रायल कोर्टात जानेवारी 2025 च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत साक्षीदारांचे जबाब नोंदवा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.