जगभरातील महत्वाच्या घडामोडी

हिंदुस्थानात आजही ’शोले’च अव्वल

अल्लू अर्जुनच्या पुष्पाने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले. मात्र, हिंदुस्थानात आजतागायत ‘शोले’ची कोणताही चित्रपट बरोबरी करू शकला नाही. 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोलेची तब्बल 25 कोटी तिकीटे विकली गेली होती. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन आणि संजीव कुमार या कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली. रशिया, अमेरिकेसह जगभरात शोले सर्वाधिक पाहिला गेला.

प्रत्येक कागद ‘आधार’ नाही; व्हेरिफाय करूनच विश्वास ठेवा

uidai.gov.in इथे गेल्यावर ‘माय आधार’ सेगमेंटच्या ‘आधार सर्व्हिसेस’च्या सेक्शनमध्ये व्हेरिफाय आधार नंबरवर क्लिक करून माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही टाकलेला 12 अंकी क्रमांक आधार असेल आणि तो निष्क्रिय केला नसेल तर आधार कार्ड योग्य असल्याची खात्री होईल.

16 तासांनंतर बोअरवेलमधून काढले अन् उपचार सुरू असताना प्राण गेले

मध्य प्रदेशातील गुना येथे दहा वर्षांच्या सुमित या चिमुरड्याला तब्बल 16 तासांनंतर बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुमित पतंग उडवताना त्याच्याच शेतातील बोअरवेलमध्ये पडला होता. या घटनेचे वृत्त कळताच तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.

विमानात इलेक्ट्रॉनिक वस्तू न्याल तर…

विमानातून प्रवास करताना काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यावर बंदी आहे. गॅझेट्स विद्युत चुंबकीय सिग्नल करतात. त्यामुळे विमानाच्या नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टीममध्ये व्यत्यय येऊ शकतो. ई-सिगारेट, फोनची बॅटरी, लेझर्स, स्पेअर बॅटरी, पोर्टेबल चार्जर तसेच स्टन गन आणि टेसर गन आदी वस्तू विमान प्रवास करताना आढळल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

टिकटॉकवर तूर्तास बंदी नको

टिकटॉकवर तूर्तास बंदी नको यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या प्रशासनाला या प्रकरणावर राजकीय तोडगा काढता येतो का ते पाहू असा ट्रम्प यांचा मानस आहे. टिकटॉक आणि बायडेन प्रशासनाने न्यायालयात विरोधी युक्तिवाद केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तूर्तास बंदी नको अशी विनंती केली.

बाईक घेण्यासाठी विकला मुलगा

एका दाम्पत्याने बाईक खरेदी करण्यासाठी आपला नऊ दिवसांचा मुलगा 60 हजार रुपयांत विकल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशातील एका दाम्पत्याने मयूरभंज जिह्यातील संकुला गावातील दाम्पत्याला आपला मुलगा विकला. दरम्यान, या दाम्पत्याने हे आरोप फेटाळून लावले असून गरिबी आणि मूल वाढवण्यास असमर्थ असल्याने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

स्पोर्ट्स शूजमुळे कामावरून काढले

एलिझाबेथ बेनासी नावाच्या 20 वर्षांच्या मुलीने कार्यालयात स्पोर्ट्स शूज घातल्याने तिला कामावरून काढण्यात आल्याची घटना यूकेमध्ये घडली. एलिझाबेथने मात्र कंपनीच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला. तिने न्यायालयात धाव घेतली. न्यायाधिकाऱ्यांनी तिला न्याय दिलाही. तिला तब्बल 32 लाख रुपयांची नुकसानभरपाई कंपनीकडून मिळाली.

रेल्वे फलाटावर झोपलेल्यांवर पाणी

संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात कडाक्याची थंडी पडली आहे. अशातच रेल्वे फलाटावर झोपलेल्या प्रवाशांवर सफाई कर्मचाऱ्यांनी अचानक पाणी फेकण्यास सुरुवात केल्याची घटना लखनऊमधील चारबाग रेल्वे स्टेशनवर घडली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या या संवेदनहिनतेबाबत रेल्वेने संबंधित एजन्सीकडून उत्तर मागितले आहे.

न्यू ईयर पार्टीसाठी लुबाडले

न्यू ईयर पार्टीच्या तयारीसाठी चार जणांनी एका कुटुंबालाच ओलीस ठेवून त्यांची लुबाडणूक केल्याची घटना नोएडाच्या सेक्टर-30 मध्ये घडली आहे. पोलिस आल्याचे वृत्त कळताच चारही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारही जणांनी संबंधित रेकी केली होत़ी

आणखी एका चिनी कंपनीवर बंदी

अमेरिकेत टीपी-लिंक या आणखी एका चिनी कंपनीवर बंदी घातली जाऊ शकते. ही एक चिनी तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीच्या राऊटरचा सर्वाधिक वापर अमेरिकेत अनेक घरांमध्ये तसेच छोट्या व्यावसायिकांकडून होतो. सुरक्षेच्या कारणास्तव सरकार या कंपनीच्या विरोधात कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.

चर्चमध्ये ‘जय श्रीराम’ नारा

मेघालय येथे एका सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरने आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका चर्चमध्ये जय श्री रामच्या घोषणा दिल्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आकाश असे या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचे नाव आहे.

देशभरात 136 वंदे भारतचा आवाज

देशभरात विविध रेल्वेमार्गांवर तब्बल 136 वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. 2024 मध्ये 62 वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आल्या. रेल्वे विभागाने 2024 मध्ये तब्बल 3 हजार 210 किलोमीटर रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण केले. तसेच ब्रॉडगेज नेटवर्कही 97 टक्क्यांपर्यंत वाढवले. रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत तब्बल 1 हजार 337 रेल्वे स्थानके निवडण्यात आली. यातील 1 हजार 198 स्थानके सुरू करण्यात आली.