देशभरातील महत्वाच्या घडामोडी

11 कोटी भक्तांनी घेतले दर्शन, 33 कोटी पर्यटक उत्तर प्रदेशात

गेल्या सहा महिन्यात सुमारे 11 कोटी भाविकांनी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामल्लाचे दर्शन घेतल्याचे समोर आले आहे. रोज लाखो भाविक रामल्लाचे दर्शन घेत आहे. 2024 च्या जानेवारी ते जून अशा पहिल्या सहा महिन्यात सुमारे 33 कोटी पर्यटकांनी उत्तर प्रदेशला भेट दिली. श्रीराम मंदिरात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर तेथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येने तसेच पर्यटकांनी काशीलाही मागे टाकले आहे. प्रयागराज येथे 4.61 कोटी भाविक, पर्यटक आणि मथुरेत 3.07 कोटी भाविक पर्यटक पोहोचल्याचे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग्र्यात पहिल्या सहा महिन्यात 76.88 लाख देशी -विदेशी पर्यटक आले. राजधानी लखनऊमध्ये पर्यटकांची संख्या 35 लाख इतकी नोंदवली गेली आहे.

मस्कची अंतराळ मोहीम फत्ते

अंतराळात धोकादायक ठरणारे ‘स्पेसवॉक’ ही आतापर्यंत प्रशिक्षित अंतराळवीरांची मक्तेदारी होती. आता अंतराळात पर्यटनाला जाऊ इच्छिणाऱ्या अंतराळ पर्यटकांना ही संधी मिळाली आहे. सर्वसामान्य माणसाला ‘स्पेसवॉक’ करण्याची संधी एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने दिली. कंपनीच्या ‘पोलारिस डॉन क्रू’मधून चौघेजण अंतराळात गेले होते. पाच दिवसांनंतर ‘पोलारिस डॉन क्रू’ रविवार, 15 सप्टेंबर रोजी पृथ्वीवर सुखरूप परतले. ड्रगन स्पेसक्राफ्टने आज दुपारी 1 च्या सुमारास फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर लँडिंग केले. एलन मस्कच्या कंपनीने 10 सप्टेंबर रोजी फाल्कन 9 रॉकेटने पोलारिस डॉन मिशन लाँच केले होते.

लॅपटॉपवरून सहज करा व्हिडिओ कॉल

आता लॅपटॉपवरून सहज व्हिडिओ कॉल करता येणार आहे. व्हॉट्सअॅप अँड्रॉईट, आयओएस आणि वेब व्हर्जनवर एन्ड-टू-एन्क्रिप्टेड कॉलिंगची सुविधा देते. यामध्ये व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलचा समावेश असून तुम्ही जगभरातील कुणाशीही संवाद साधू शकतात. मुख्य म्हणजे केवळ स्थिर इंटरनेट कनेक्शनची गरज लागते. व्हॉट्सअॅप कॉलिंग फीचरमध्ये कॉल लिंक आणि ग्रुप व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. यात एकाच वेळी 32 व्यक्तींच्या कॉलचा समावेश होऊ शकतो. तसेच समूह व्हिडिओ कॉलिंगमध्ये 8 जण एकत्र येऊ शकतात. व्हॉट्सअप डेस्कटॉप कॉलिंग फीचर सध्या केवळ व्हॉट्सअॅप वेब अॅपवर उपलब्ध आहे.

ट्विटरच्या माजी सीईओने उभारली कंपनी

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर पराग अग्रवाल यांची कंपनीतून हकालपट्टी केली होती. ट्विटरचे सीईओ म्हणून काम करत असताना पराग अग्रवाल यांचे सॅलरी पॅकेज 100 कोटी रुपये होते. इतके मोठे पॅकेज असलेली नोकरी गमावली तरी पराग अग्रवाल हिंमत हरले नाहीत. आज त्यांनी स्वतःची कंपनी उभारली आहे. ट्विटरमधील नोकरी गमावल्यानंतर पराग अग्रवाल यांनी एआय सेक्टरमध्ये प्रवेश केला असून स्वतःची कंपनी सुरू केली आहे. त्यांच्या नवीन स्टार्टअपसाठी 249 कोटींचा निधीदेखील मिळाला. त्यांचे स्टार्टअप OpenAi ChatGPT तंत्रज्ञानाप्रमाणे सॉफ्टवेअर विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करते.

गणित-विज्ञानाचे प्रश्न सुटणार, ‘ओपनएआय’ने आणले नवीन मॉडेल

ओपनएआयने त्यांच्या एआय तंत्रज्ञानात मोठी सुधारणा करत ‘ओपनएआय 01’ मॉडेल सादर केले. या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत किचकट गणितीय आणि वैज्ञानिक प्रश्नाचे कोणतेही उत्तर क्षणात देते. गणित, कोडिंग आणि विज्ञानात याने उच्च कामगिरी केली असून इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाडमध्ये 83 टक्क्यांनी अचूकपणे समस्या सोडवल्या आहेत. ओपनएआयचे संस्थापक सॅम ऑल्टमन यांनी ‘ओपनएआय01’ मॉडेल विकसित केले आहे. त्याचा वापर आरोग्य संशोधनात, क्वांटम ऑप्टिकसाठी, गणितीय सूत्रे तयार करण्यासाठी करता येतो.

अल्बर्ट आइनस्टाईन यांचे दुर्मिळ पत्र 33 कोटींना

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या एका दुर्मिळ पत्राचा लिलाव 33 कोटी रुपयांना करण्यात आला. या पत्रावर अल्बर्ट आइनस्टाईन यांची सही होती. अल्बर्ट आइनस्टाईन यांनी हे पत्र 1939 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या रुझवेल्ट यांना लिहिले होते. या पत्रात अल्बर्ट आइनस्टाईन यांनी अणुबॉम्ब आणि त्याचा शस्त्र म्हणून होणारा वापर याबाबत इशारा दिला होता. बिझनेस इनसायडरच्या वृत्तानुसार, अल्बर्ट आइनस्टाईन यांचे जे पत्र लिलावात विकण्यात आले त्याची एकमेव प्रत होती. मायक्रोसॉफ्टचे सह ससंस्थापक पॉल एलन यांच्या संग्रही ते होते. जे 2002 मध्ये खरेदी करण्यात आले. आता या पत्राचा लिलाव करण्यात आला आहे. या पत्राचा लिलाव क्रिस्टीज या कंपनीने केला. पॉल एलन यांच्या आधी या पत्राचे पहिले मालक प्रकाशक मॅल्कम फोर्ब्स होते.

बेबिंका चक्रीवादळामुळे शांघायची विमाने रद्द

प्रचंड वेगाने शांघायचा किनाऱ्याकडे येत असलेल्या बेबिंका चक्रीवादळामुळे शांघायमधील होंगकियाओ आणि पुडोंग विमानतळावरील स्थानिक वेळेनुसार रात्री 8 नंतरची शेकडो विमान उड्डाणे आज रद्द करण्यात आली आहेत. सुमारे सहाशेहून अधिक उड्डाणे यामुळे होऊ शकणार नाहीत. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होऊ शकते.

निपाह विषाणूमुळे एकाचा मृत्यू

येथील एका खाजगी रुग्णालयात नुकताच मृत्यू झालेल्या 24 वर्षीय व्यक्तीला निपाह विषाणूची लागण झाली होती, असे केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रविवारी सांगितले. बंगळुरूहून आलेल्या या रुग्णाच्या मृत्यूनंतर प्रादेशिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या मरणोत्तर तपासणीत निपाह संसर्गाचा संशय निर्माण झाल्याने या रुग्णाचे उपलब्ध नमुने ताबडतोब कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. पुण्याच्या विषाणू अभ्यास संस्थेनेही या संसर्गाची पुष्टी केली आहे. 151 लोकांपैकी निकटच्या लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

दिल्ली मेट्रो स्थानकांवर साध्या वेशातील पोलिस

वाढत्या गुन्हेगारीचा सामना करण्यासाठी आणि दिल्ली मेट्रोतील प्रवाशांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी, शहर पोलिस दलाकडून अतिसंवेदनशील मेट्रो स्थानकांवर साध्या वेशातील अधिकारी, पोलिस तैनात करण्यात येतील. पोलिसांनी एकूण 190 मेट्रो स्थानकांमधून गोळा केलेल्या तपशीलाचा अभ्यास करून चोरी, छळ आणि इतर गुन्हे घडणाऱ्या 32 मेट्रो स्थानकांची यादी तयार केली आहे. या स्थानकांच्या प्रवेशद्वारावर एक पोलिस अधिकारी असेल तर, महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह दोन-तीन जण गर्दीच्या वेळी फलाट आणि गाड्यांवर लक्ष ठेवतील.

दूरसंचार कंपन्यांना ट्रायचा झटका

नको असलेले, बिनकामाचे कमर्शियल कॉल आणि एसएमएस अर्थात स्पॅमने पिच्छा पुरवलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यात अपयश आल्याबद्दल टेलिकॉम कंपन्यांना ठोठावलेला दंड आता त्यांच्या बँक गॅरंटी रकमेतून वसूल करण्यात येणार आहे. भारतीय दूरसंचार धोरणविषयक नियामक ट्रायने दूरसंचार विभागाला तशा सूचना दिल्या आहेत. स्पॅम रोखण्यात अपयश आल्याबद्दल या कंपन्यांना दंड ठोठावण्यात आला होता. मात्र आजपर्यंत ही रक्कम वसूल करण्याबाबत वारंवार स्मरणपत्रे पाठवण्याखेरीज अन्य ठोस पाऊल उचलण्यात आले नव्हते. आता अचानक या कंपन्यांनी बँक गॅरंटी म्हणून भरलेल्या हमी रकमेतून हा दंड वसूल करण्याची शिफारस ट्रायने केली आहे.